लखीमपूर घटनेचा बेलापूरात शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध.
केंद्रीय गृहमंत्री यांच्या ताफ्यातील दोन मोटारीने शेतकऱ्यांना चिरडण्याच्या संतापजनक घटने बद्दल देशभरात निषेध व्यक्त होत आहे. बेलापूर येथील सेवा सोसायटीच्या प्रांगणात पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक यांच्या उपस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी अरुण पाटील नाईक म्हणाले की देशाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर कायम अन्याय होत आहे. शेतमाल निघत असताना भाव पाडायचे, हंगाम संपला की पुन्हा भाव वाढवायचे. दहा हजारांवर गेलेले सोयाबीन आज पाच हजारांपर्यंत खाली आलेले आहे. ही शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. गेली दहा महिन्यापासून दिल्ली सिमेवर आपल्या प्रश्ना संदर्भात आंदोलन करीत असणाऱ्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला केंद्रातील मोदी सरकारला वेळ नाही. दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी निदर्शने करणाऱ्या शेतकर्यांच्या अंगावर गाड्या घालून जगाच्या पोशिंद्यालाच चिरण्याचे काम केले जात आहे. ही घटना निंदनीय असून मी या घटनेचा जाहीर निषेध करीत आहे, अशा तीव्र शब्दात श्री पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेसंदर्भात ज्या कोणाचे नाव आले आहे, त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी बेलापूर सोसायटीचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे यांनी केली.