जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधु यांना निरोप, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, उपपोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी यांची उपस्थिती.
अहमदनगर(प्रतिनिधी ) नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून ईशू सिंधू हजर झाल्यापासून त्यांनी सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. सर्वसामान्यांना त्यांची न्याय मिळवून देण्यासाठी धडपड असते. एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभर ख्याती निर्माण झाली. जिल्ह्याच्या कारभारात काम करत असताना जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या रुपाने एक चांगला सहकारी मिळाला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू पुढील 20 महिने शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याने त्यांना शनिवारी (दि.7) निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. विकास वाघ, कॅम्पचे पो. नि. प्रविण पाटील, नगर तालुका पोलिस ठाणे पो.नि. रजपूत, एमआयडीसीचे पो.नि आदींसह जिल्ह्यातील सर्व विभागीय पोलिस उपअधीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे शाखा आदींसह विविध विभागातील कर्मचार्यांसह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, उपपोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी 1 मार्च 2018 मध्ये जिल्ह्यात पदभार स्वीकारला होता. जिल्ह्यात 9 महिने यशस्वी कार्यकाळ सांभाळून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. विविध सण उत्सव काळात चोख बंदोबस्त ठेवून शांतता ठेवली, गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण केला होता, असे प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांनी आपल्या भाषणात सांगितले.