सनातन संस्थेचे डॉ आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पाठविलेल्या संदेशात स्वामी गोविंददेव गीरीजी महाराज यांनी पुढे म्हटले आहे की, ‘सनातन संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते निष्काम भावनेने व स्वयंशिस्तीने सनातन धर्माचा प्रसार करत आहेत. या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवनाचा स्वाध्याययज्ञ, सेवायज्ञ आणि लोकजागरणयज्ञ सुरू केला आहे. हे कार्य अत्यंत विलक्षण आहे आणि त्यातूनच सनातन राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग उजळणार आहे.
या महोत्सवात विविध राष्ट्रनिष्ठ नेते, धर्माचार्य, कार्यकर्ते आणि सनातनप्रेमी एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. या मंथनातून केवळ नवनीत नव्हे, तर अमृत उदयाला येईल आणि याच अमृतकलशातून सनातन राष्ट्राला नवतेज प्राप्त होईल. आज भारताला समर्थ राष्ट्र बनवायचे असेल, तर सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची आवश्यकता आहे. भारताच्या सामर्थ्यावरच जगात समता, बंधुता आणि खरी स्वतंत्रता टिकू शकते. म्हणूनच हे कार्य एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे नसून, धर्माचे आणि राष्ट्राचे कार्य आहे.
त्यामुळे सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, धर्मगुरूंनी आणि सामान्य भक्तांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे योगदान द्यावे. भारताच्या सुंदर, समृद्ध भविष्यासाठी हा महोत्सव एक सुवर्णसंधी आहे. या महामंथनातून मिळणाऱ्या तेजाने भारत गगनभरारी घेईल आणि सनातन धर्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरेल. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य कार्यात सहभागी होऊ आणि भारताला त्याच्या सनातन तेजाने पुन्हा उभे करूया, असेही आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
Post a Comment