कोपरगाव (गौरव डेंगळे) – ट्रॅडिशनल शोतोकन कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारी वार्षिक ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि प्रशिक्षण शिबिर यंदा दिनांक ४ मे ते ६ मे २०२५ दरम्यान कोपरगाव येथे यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात व परीक्षेत राज्यभरातून एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथून ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.
या शाळेतील आपेक्षा भगत,साईशा जोरी आणि भार्वी थोरात यांनी उत्तम कामगिरी करत प्रथमच ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. तर हर्ष लंगोटे याने दुसऱ्या डिग्रीचा ब्लॅक बेल्ट (2nd Dan) मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सरस ठोळे,आदर्श भगत, धनश्री सोनवणे, अनन्या पुनकर व शिवकन्या घोरपडे यांनी ब्लॅक बेल्ट कॅम्पमध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिकांद्वारे कराटेच्या तंत्रांची प्रगती साधली.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षिका वर्षा देठे यांचा 'बेस्ट इन्स्ट्रक्टर' म्हणून सन्मान करण्यात आला.त्यांनी दीर्घ काळापासून शिस्तबद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,नेतृत्वगुण आणि आत्मसंरक्षण कौशल्य विकसित केले आहे.त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, शिक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाने, नथाली फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या परीक्षा व शिबिराचे आयोजन शिहान सुदर्शन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कराटेचे शारीरिक व मानसिक महत्व पटवून दिले. शिबिरात काता (तांत्रिक हालचाली), कुमिटे (लढाईचे तंत्र), ब्रेकिंग टेक्निक्स, डिसिप्लिन, शारीरिक तंदुरुस्ती आणि कराटेचे मूलभूत तत्त्वज्ञान यावर विशेष भर देण्यात आला.
या यशामुळे श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा गौरव वाढला असून,पालक व शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षिकेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
Post a Comment