खेळाडूंच्या पालकांच्या हस्ते श्रीफळ फोडून झाली स्पर्धेला सुरुवात
श्रीरामपुर(गौरव डेंगळे): आरोग्य व शारीरिक क्षमता यामधील फरक खेळाडूंना क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व पालक यांनी लहान वयात लक्षात आणून देणे खूपच गरजेचे आहे.यश-अपयश,संघात निवड याहीपेक्षा खेळाडूंनी खेळण्याच्या फायद्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे,असे प्रतिपादन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेते प्रा सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निवड चाचणी प्रसंगी केले.
येथील महाले पोदार क्रीडा संकुलच्या व्हॉलिबॉल मैदानावर चौदा वर्षाखालील मुला-मुलींच्या पुणे विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेची आज निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी पुणे जिल्हा,अहमदनगर जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून सुमारे १५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन प्रा सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाले प्रतिष्ठानचे श्री ओम महाले, दैनिक स्नेहप्रकाश कार्यकारणी संपादक श्री स्वामीराज कुलथे,श्री सनी हिरन,श्री पार्थ दोशी, कुलदीप कोंडे,श्री पापा शेख, नितीन बलराज,श्री शैलेंद्र त्रिपाठी,श्री शंभूराजे मनुर,सर्वेश राठी,धनंजय माळी, नितीन फुलपगार सह आदी मान्यवर उपस्थित होते .प्रा देशमुख यांनी निवड चाचणी स्पर्धेपूर्वी सर्व खेळाडूं तंदुरुस्त राहण्यासाठी काही व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी या सर्व व्यायाम प्रकाराचा खेळाडूंबरोबर पालकांनी देखील आनंद घेतला.
या निवडचाचणीतून संभाव्य १६ मुले व १६ मुलीच्या पुणे विभाग संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वी होणाऱ्या शिबिरातून अंतिम १२ मुले व १२ मुलीच्या संघाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती श्री नितीन बलराज यांनी दिली. दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान मिरज येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित होणार आहे.
Post a Comment