
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत पोलिसांना सूचना
शिर्डी प्रतिनिधी-शिर्डी शहरातील हॉटेल,लॉजमध्ये जर वेश्या व्यवसाय चालत असेल तर त्यावर तातडीने कारवाई करून सदरचे हॉटेल, लॉजींग सिल करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले असून भाविकांना छळणार्या पॉलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी शिर्डी शहरातील हॉटेल लॉजींग मालक चालक यांची बैठक बुधवारी पोलीस स्टेशनसमोरील मॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, सहा पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती कोकाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.यावेळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी प्रत्येकाचे मत ऐकून घेतले. यानंतर श्री. पाटील यांनी सांगितले की, येथील हॉटेल इंडस्ट्रीजचे मालक चालक यांचे नुकसान व्हावे अशी आमची इच्छा नाही. या ठिकाणी येणारा भाविक सुरक्षीत असायला हवा. जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव कलम 144 लागू करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये येणार्या पर्यटकांची ओळखपत्र घेणे आवश्यक आहे. विमानाने शिर्डीत येणार्या भाविकांचे रेकॉर्ड तपासणे गरजेचे आहे. भाविकांना चुकीच्या सेवा दिल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी. हॉटेल तसेच लॉजमध्ये काम करणार्या कामगारांचे देखील ओळखपत्र किंवा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला घ्यावेत. हॉटेलमध्ये इंटरनेटद्वारे देण्यात येणारी अनसिक्युअर वायफाय सेवा सिक्युअर करण्यात यावी.परदेशी पर्यटकांचे प्रत्येक हॉटेलमध्ये सी फार्म भरुन घेणे क्रमप्राप्त असून परदेशी पर्यटकांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. परदेशी पर्यटकांच्या निवासासाठी शिर्डी शहरात अद्यापपर्यंत फक्त चोवीस हॉटेलला मान्यता देण्यात आली आहे. ज्यांना सी फार्म बाबत माहिती हवी असल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाला संपर्क साधावा. मुदतबाह्य तसेच व्हिसा संपलेल्या नागरिकांना बिलकुल थारा देऊ नये.प्रत्येक हॉटेल, लॉजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. येणार्या भाविकांना तसेच लोकांना त्रास देणार्या पॉलीशीवाल्यांवर तसेच वेळप्रसंगी हॉटेल मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल याची गांभीर्याने दक्षता घ्यावी. यासंदर्भात पोलीसांना सक्त सुचनाही देण्यात आल्या आहेत.भाविकांना छळणार्या पॉलीशवाल्यांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे.शहरातील रिक्षावाल्यांचे रेकॉर्ड तसेच वाहनांची कागदपत्रे तपासणी करण्यात यावी, असेही शिर्डी वाहतूक कक्षाचे पोलिस निरीक्षक यांना आदेश देण्यात आले. घरमालकांनी भाडेकरुंना भाड्याने घर देताना भाडेकरूंची सर्व माहिती घेऊन पोलीस ठाण्यात द्यावी. सायबर कॅफे चालक-मालक यांनी येणार्या ग्राहकांचे ओळखपत्र घेऊन प्रवेश द्यावा. इंटरनेट वापरलेल्या कालावधीची नोंद घ्यावी. वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यासाठी वापर करू देऊ नये. शिर्डी शहरात सदरची कारवाई निरंतर चालू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरात गांजा, दारू, नशेची पदार्थांचे विक्री तसेच अवैध धंदे याबाबत माहिती देणार्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही उपविभागीय अधिकारी सातव यांनी सांगितले.

Post a Comment