श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यासह शहरात ऐन सण-उत्सवाच्या काळातच तासन्तास वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या विभागातील अधिकार्यांनी तर नको ग्राहकांचा डोक्याला ताप म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून बिनधास्त झाले आहेत. इकडे उष्णतेच्या उकाड्यामुळे नागरिक संतप्त झाले असून आता दाद कोणाकडे मागावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.काल सलग दुसर्या दिवशी तालुक्यासह शहरातील वीज दुपारपासून गायब होती. रात्री उशिरा कधीतरी वीज आली आणि गायबही झाली हे लोकांना कळलेच नाही. काही नागरिक उकाड्यामुळे इतके हैराण झाले आहेत की, रात्र रात्र जागून काढत आहेत. वीज कधी येणार अशी विचारणा कर्मचार्यांकडे केली तर कर्मचारी तर या विभागाचे प्रमुख आहेत असे समजून नागरिकांबरोबर अर्वाच्च भाषा वापरून उडावाउडवीची उत्तरे देत असतात. कधी काहीही न सांगता फोन ठेवून देत कट करत असतात. वरिष्ठ सर्वच अधिकार्यांनी तर वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा नाहक त्रास नको म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले आहेत. एकीककडे नागरिकांची झोप उडवायची आणि दुसरीकडे अधिकारी व कर्मचारी आरामशीर झोपायचे असा प्रकार सध्या या विभागात सुरू आहे.काल दुसर्या दिवशीही वीज अचानक कधीही जाते आणि कधीही येते. यामुळे शहरातील पालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजनही कोलमडले आहे. गेली दोन दिवस शहराला पाणीपुरवठा केला जाणार नाही हे अचानक जाहीर केल्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. भर उन्हाळ्याच्या काळात पाणी पाणी अशी परिस्थिती झाली आहे. वीज कशामुळे गेली? का गेली? अशी चौकशी करण्याकरिता फोन केला असता कोणीही धड उत्तर दिले नाही. महावितरणच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष झाले असून कर्मचारी मनमानी पध्दतीने आपले कामकाज करत आहेत. त्यामुळे या सगळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत.लोडशेडींग आहे की नाही याची कल्पना नागरिकांना दिली जात नाही. वीज कधी जाणार कधी येणार याचीही माहिती दिली जात नाही. पूर्वी शहरात व तालुक्यात वीज कधी जाणार कधी येणार याची सविस्तर माहिती मोबाईल व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियावर टाकली जात होती. मात्र माहिती टाकणे तर सोडाच परंतु स्वतःचे मोबाईलही स्वीच ऑफ करून ठेवण्याएवढी मजल अधिकार्यांची झाल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.
थकबाकी असताना नागरिकांना दमबाजी करून कायद्याची भाषा वापरुन त्याचा धाक दाखवत वसुली करण्याचा धडाका वितरणने चालविला होता तसा धडाका वीज का जाते आणि ती कधी येणार-कधी जाणार याची माहिती देण्याचा ठेवला असता तर नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले नसते. वीज कट करताना त्यांची भाषा ग्राहकांना अपमान करणारी व वेदना देणारी होती आता अधिकार्यांची तोंडे बंद का? असा सवालही यावेळी विचारला जात आहे. काही ठिकाणी 80 टक्के वसुली होऊनही त्या ठिकाणी वीज नियमित देण्याची सेवा का दिली जात नाही? असा सवालही केला जात आहे.
Post a Comment