अहमदनगर प्रतिनिधी-पैशाच्या वादातून मजुराचा खून करणारा आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेंडी (ता. नगर) शिवारात अटक केली. बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यास पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.संजय पांडु पवार (वय 40) हे कुटुंबीयासह पिंप्री घुमरी (ता. आष्टी) येथे राहतात. त्यांचे वडील पांडू हे बाभळीची लाकडे तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याचे काम करत होते. त्यांचे गावातील बबन वारूळे याचे बरोबर बाभळीची झाडे तोडण्याचे मजुरीवरून वाद झाला होता. त्यावेळेस संजय यांनी बबन वारूळे यांना आतापर्यंत झालेल्या कामाचे पैसे द्या. मी उद्या सकाळी राहिलेले काम करून देईल, असे म्हणून वाद मिटवला होता. परंतु, 21 जानेवारी 2022 रोजी पिंप्री ते घुमरी रस्त्याच्याकडेला सखाराम महादेव साबळे यांच्या घरापाठीमागे पांडू चंदर पवार (वय 60) हे जखमी अवस्थेत पडलेले आहेत, अशी माहिती मिळाली. संजय यांनी खात्री केली असता, पांडू पवार यांचा खून झालेला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात आरोपी बबन श्रीधर वारूळे (रा. पिंप्री घुमरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. आष्टी पोलिसांनी आरोपी बबन हा अहमदनगर जिल्ह्यात पळून आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी बबन यास शेंडी शिवारात सापळा लावून पकडले.सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार संदीप पवार, मनोज गोसावी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, सागर ससाणे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, कमलेश पाथरुट, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस पुढील कार्यवाहीसाठी आष्टी पोलिसांकडे सोपविण्यात आले.
Post a Comment