या दोन आरोपींकडून आतापर्यंत नगर आणि पुणे जिल्ह्यात चोरलेल्या दहा मोटरसायकली जप्त केलेले असून या जप्त केलेल्या मोटर सायकलची किंमत सात लाख 87 हजार इतकी आहे.याबाबत अधिक हकीकत अशी की पाथर्डी येथील रहिवासी अशोक जाधव यांची मोटरसायकल 23 जानेवारी रोजी घरासमोरून चोरीस गेली होती. याबाबत त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.एकंदरीतच नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोटर सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी एक स्वतंत्र पथक नेमून पाथर्डीतील मोटरसायकल चोरी तसेच जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते. या पथकाने याबाबत तपास सुरू केलेला असतानाच पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने नगर तालुक्यातील बहिरवाडी, जेऊर येथील सागर सुदाम जाधव याला ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने पाथर्डी येथील मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्यामध्ये अजून त्याच्या सोबत कोण आहे याची माहिती त्याकडून मिळाली असता या टोळीमध्ये महेश उर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे, राहणार बहिरवाडी जेऊर तालुका नगर आणि गौतम पाटील अशी नावे सांगितली. यातील महेश उर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे याला ताब्यात घेण्यात आले मात्र तिसरा आरोपी हा फरार आहे.
यातील ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे अन्वेषण शाखेने पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहे. या टोळीतील तीनही आरोपींवर नगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ही टोळी सराईत असून मोटरसायकल चोरी प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल, पोलिस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे कर्मचारी सपोनि सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पवार, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोज गोसावी, संतोष लोंढे, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, सागर ससाणे, विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे यांनी यशस्वी कामगिरी केली.
Post a Comment