श्रीरामपूर प्रतिनिधी-अनेक वर्षे कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावलेले मुरकुटे पिता-पुत्र व शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काल उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर दोघांनीही फराळाचा आस्वाद घेतला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या फराळाची ‘गोड’ चर्चा शहरात सुरू झाली आहे.माजी आ. स्व. जयंतराव ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यातील राजकीय संघर्ष तालुक्याने जवळून पाहिला आहे. कार्यकर्त्यांनी त्याचा चांगलाच अनुभही घेतला आहे. ससाणे-मुरकुटे यांच्यात विस्तवही जात नव्हता. मात्र गेल्या एक ते दीड वर्षापासून ससाणे-मुरकुटे यांच्यातील संघर्ष हळूहळू मावळताना पहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे या दोघांनाही बिनविरोध संचालक करण्यात महत्वाची भूमिका बजावून या नव्या मैत्रीची रेशिमगाठ बांधली. ससाणे यांच्या या दिवाळी फराळ कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही हजेरी लावली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समवेत त्यांनीही फराळाचा आस्वाद घेतला. माजी आमदार भानुदास मुरकुटे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या हजेरीची काल दिवसभर शहरात खमंग चर्चा सुरु होती. त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर फिरत होते.
Post a Comment