बेलापूर -(प्रतिनिधी ) येथील बाजारतळ परिसरात तरस या सहसा आपल्या परिसरात न आढळणार्या दुर्मिळ प्राण्याचे अचानक दर्शन झाले. यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.बेलापूर येथे सोमवारी संध्याकाळी तरस या प्राण्याचा संचार आढळून आला. दुर्मिळ प्रजाती वर्गातील हा प्राणी मांसाहारी मानला जातो. मेलेल्या प्राणी, पक्षांचे मांस व हाडे खावून गुजराण करणे हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. तरस हा निशाचर असून अंगाच्या विशिष्ट ठेवणीमुळे शिकार करत नाही. असे असले तरी रात्रीच्यावेळी शेळ्या, कोंबड्यांवर मात्र ताव मारतो.बिबट्याने शिकार करून खाऊन उरलेल्या मांस व हाडांचे अवशेष खाण्यासाठी तो भटकत असावा अशीही शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे हा प्राणी आढळल्याने याची गावभर चर्चा पसरली. तरस आढळून आल्याबाबत मोबाईलवर फोटोसह संदेश टाकून लोकांना सावधगिरीची सूचना देण्यात आली. बेलापूर परिसरात आधीच बिबट्याची दहशत असताना त्यात तरस आढळल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
Post a Comment