श्रीरामपूर (प्रतिनिधी)-करोना तपासणी केलेल्या किटची विल्हेवाट न लावता अज्ञात व्यक्तीने ते साहित्य प्रवरा नदीच्या काठावर टाकून दिल्याप्रकरणाची काल जिल्हाधिकार्यांनी दखल घेत तहसीलदारांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील प्रवरा नदी पात्रालगत मोठ्या प्रमाणात करोना तपासणीत वापर केलेले किट त्यात सलाईन, हातमोजे, रँपीड टेस्टसाठी वापरण्यात येणारे साहीत्य, मास्क, सिरींज आदि वापरलेले साहीत्य उघड्यावर टाकून दिल्याचे आढळून आले आहे.
एका प्लॅस्टिकच्या पिशवीतील हे साहित्य परिसरात अस्ताव्यस्त विखुरलेले होते. वास्तविक हे साहीत्य नष्ट करणे आवश्यक असताना अज्ञात व्यक्तीने बेजबाबदारपणे ते प्रवरा नदी काठावर टाकून दिले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यापर्यंत पोहोचली.त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांंना घटनास्थळी जावून चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी डॉ. देविदास चोखर, कामगार तलाठी कैलास खाडे, जि. प. सदस्य शरद नवले, प्रा. अशोक बडधे, देविदास देसाई, सुनील बारहाते, अनिल गाढे, अशोक शेलार, बेलापूर खुर्दचे ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, पोलीस हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, संतोष शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी याठिकाणी आणखी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत असेच साहित्य आढळून आले. या साहित्याचा पंचनामा करुन वैद्यकीय अधिकार्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. देविदास चोखर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला.
Post a Comment