संगमनेर (शहर प्रतिनिधी)संगमनेर शहरात लॉकडाऊन सुरू असतानाही शहरातील तीन बत्ती चौकात काही नागरिक घोळक्याने फिरत होते. करोना काळात घोळक्याने फिरत असणार्यांना शहर पोलिसांनी चोप दिला.याची माहिती मिळताच संतप्त जमावाने येत पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. जमावाचा रुद्रावतार पाहून पोलिस अधिकार्यांसह पोलिसांनी येथून काढता पाय घेतला. पोलीस व जमाव आमने-सामने आल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.सध्या पवित्र महिना सुरू असल्याने सायंकाळी नागरिक बाहेर पडतात. जमावबंदी असतानाही या ठिकाणी गर्दी होत असते. काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तीन बत्ती चौक व पुणे रोड परिसरात अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी बंदोबस्तास असलेल्या अहमदनगर येथील दंगल नियंत्रण पथकातील पोलिसांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. या पथकातील काही कर्मचार्यांनी नागरिकांना चांगला चोप दिला. यावेळी या नागरिकांची व पोलिसांची जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.घटनेची माहिती समजताच परिसरातील सुमारे 200 नागरिक घटनास्थळी जमा झाले. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहन अडविले. त्यांनी पोलिसांना मारहाणीबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमावातील काही जणांनी दोघा पोलिस कर्मचार्यांना मारहाण केली. संतप्त जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक सुरू केली. रस्त्यावरून जाणार्या एका वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. जमावाचा रुद्रावतार पाहून पोलीस अधिकार्यासह पोलीस कर्मचार्यांनी तेथून वाहनासह काढता पाय घेतला.लॉकडाऊनमुळे संगमनेरात दंगल नियंत्रण पथक बोलाविण्यात आले आहे. हे पथक शहर पोलीस अधिकार्याच्या नियंत्रणाखाली काम करीत आहे. गेल्या दोन दिवसापासून या पथकातील कर्मचार्यांनी शहरातील अनेक नागरिकांना ‘प्रसाद’ दिला आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचा काल दुपारी उद्रेक झाला. नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये असे आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले असतानाही संगमनेरात मात्र या आदेशाचे पालन होतांना दिसत नाही. पोलीस अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.पोलीस अधिकार्यांच्या सूचनेनुसार काही पोलीस नागरिकांना बेदम मारहाण करीत असल्याचे तक्रारी होत आहे. शहरातील तीन बत्ती चौकात घडलेल्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. गुन्हा दाखल होतो की नाही याबाबतही उलटसुलट चर्चा पोलीस वर्तुळात सुरु होती.रात्री उशीरापर्यंत मारहाण झालेल्या पोलीस कर्मचार्यांनी फिर्याद दाखल करण्यास असमर्थता दाखविल्याने गुन्हा कुणाविरोधात दाखल करायचा हा प्रश्नही पोलीस अधिकार्यांपुढे होता. यावर रात्री उशीरापर्यंत कुठलाही तोडगा निघत नसल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या समवेत रात्री उशीरापर्यंत बैठक सुरु होती.
Post a Comment