श्रीरामपूर (प्रतिनिधी)-हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नेपाळमधल्या माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वांत उंच शिखराच्या बेस कॅम्पवर श्रीरामपूर येथील तरुणाने भगवा ध्वज फडकावून पराक्रम केला आहे.शहरातील दळवीवस्ती मोरगे हॉस्पिटल परिसरात राहणारे सुनील कांबळे यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प नुकतेच सर केले आहे. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणे म्हणजे जवळपास माऊंट एव्हरेस्ट सर करण्याची 60% मोहीम पूर्ण करणे होय. 21 एप्रिल 2021 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथून सुनील विलास छाया कांबळे यांनी एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर विविध टप्पे पार करून तसेच करोना आणि वैद्यकीय संदर्भातील इतर चाचण्या यांची पूर्तता करून सुनील कांबळे काल 1 मे रोजी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (उंची पाच हजार 364 मीटर) इथपर्यंत पोहोचले आहेत. तेथे पोहचल्यावर त्यांनी भगवा व तिरंगा ध्वज फडकाविला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महिन्यात ते एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचतील आणि श्रीरामपूरसाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित करतील अशी आशा आहे. सुनील कांबळे यांना या पुढच्या एव्हरेस्ट मोहिमेसाठी श्रीरामपूरकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment