बँगलोरच्या रिडास इंडीया कंपनीने बुलडाणा येथील एका गुंतवणूकदाराकडून तब्बल 11 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक करून घेत मूळ परतावा व नफा न दिल्याच्या तक्रारीवरून आज 27 ऑक्टोंबर रोजी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कंपनीमालक व इतर एका विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील इकबाल नगर, टिपू सुलतान चौकात राहाणाऱ्या फिर्यादी मो. साजीद अब्दुल हसन देशमूख यांनी 7 मार्च 2017 ते 28 सप्टेंबर 2018 दरम्यान स्वतः व कुटुंबातील आई,वडील, भाऊ,पत्नी यांचे एनएफटी व आरटीजीएस मार्फत 11 लाख 50 हजार रुपयांची बँगलोर येथील रिदास इंडिया कंपनीत गुंतवणूक केली. त्यांना कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अय्यूब हुसेन व मो. अनिस आयमन दोघे रा. बँगलोर यांनी गुंतवणूकीच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात नफ्याचा परतावा व मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दिले होते. मात्र कंपनीकडून कोणतीच रक्कम देण्यात न आल्याची व इतरही नागरीकांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्यादीने आज 27 ऑक्टोंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली असता फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबातील सदस्यांना आमिष देऊन 11 लाख 50 हजार रुपयांनी त्यांना गंडविल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कंपनी मालक तथा डायरेक्टर मो. अयुब हुसेन व मो. अनिस आयमन या दोघांविरुद्ध भांदवी कलम 420,406,409,34 सह महाराष्ट्र ठेवी वित्तीय संरक्षण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नंदकिशोर काळे करीत आहे.
Post a Comment