श्रीरामपूर (प्रतिनिधी) गेले साडे तीन महिने कोरोना पासून अलिप्त राहिलेल्या श्रीरामपूर शहरांमध्ये देखील आठवड्याभरात दहा रुग्ण आढळल्याने शहरवासीयांना मध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून इतर शहराप्रमाणे आपल्या श्रीरामपूर शहरात हा रोग अधिक वाढू नये म्हणून प्रशासनाने तातडीने किमान आठवड्याभरासाठी श्रीरामपूर शहरात लॉक डाऊन लागू करावा अशी मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. नगराध्यक्षाअनुराधा आदिक यांनी याबाबत यापूर्वीच प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र प्रशासनाने नियमावर बोट ठेवत त्या पत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे शहरांमध्ये आज करोना वाढत आहे. वेळीच उपाययोजना केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. शहरांमध्ये सापडलेले रुग्ण हे वेगवेगळ्या भागातील आहेत. गोंधवणी रोड, वार्ड नंबर 2, कांदा मार्केट परिसर, बेलापूर रोड आदी विविध भागांमध्ये हे रुग्ण आढळून आले आहेत. शहराची बाजारपेठ उघडल्यापासून शहरांमध्ये रस्त्यावरील गर्दी वाढली आहे. ग्रामीण तसेच शेजारच्या तालुक्यातील लोक दररोज बाजारपेठेत येत आहेत. बाजारपेठ सुरू करताना प्रशासनाने जे नियम घालून दिले त्याकडे सर्वच घटक सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. बहुतांश नागरिक गाडीवर असताना किंवा दुकानात जाताना मास्कचा वापर करीत नाही. दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही. सॅनिटायझर चा वापर केला जात नाही. सुरक्षित अंतर राखले जात नाही. त्यामुळे सर्व नियम धाब्यावर बसवल्याने शहरात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ती रोखण्यासाठी प्रशासन, नगरपालिका आणि गृहखाते यांनी संयुक्तपणे निर्णय घेऊन लॉक डाउन लागू करून त्याची कडक अंमलबजावणी करावी. शहराच्या काही भागांमध्ये प्रशासनाला मदत करण्याच्या नावाखाली काही लोक विनाकारण गर्दी करतात. टोळके बनवून चौकामध्ये उभे राहतात. त्यांनासुद्धा रोखण्याची गरज आहे. पोलिसांचे हस्तक असणारे काही घटक हे प्रशासनाला मदतीच्या नावाखाली चुकीचे सल्ले देतात अशीही चर्चा असून पोलिसांनी या लोकांना दूर ठेवणे आवश्यक आहे. नगरपालिका कर्मचारी शहरांमध्ये शिस्त लावण्यासाठी कमी पडतात. हे काम पोलिसांना दिले पाहिजे. कारण पालिका कर्मचाऱ्यांचे कोणीच ऐकत नाही. तेव्हा जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यापासून बोध घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा.घरातील एकाच व्यक्तीने जाऊन सर्व कामे करावीत. विनाकारण रस्त्यांवर किंवा दुकानात किंवा कार्यालयात गर्दी करू नये.अशी अपेक्षाही जनतेतून व्यक्त होत आहे.
मागणीकडे दुर्लक्ष
श्रीरामपूर शहरामध्ये लॉक डाऊन लागू करण्याची नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केलेली मागणी योग्य होती . परंतु त्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची भावना शहरवासीयांमध्ये दिसून येत आहे
कडक अंमलबजावणीची गरज
शहरांमध्ये वाढती रुग्णांची संख्या पाहता बाजारपेठ बंद करून लॉक डाऊन ची कडकअंमलबजावणी करावी . विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी. बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात यावे, तसेच ही माहिती लपविणाऱ्या लोकांवरही कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
Post a Comment