संगमनेर (शहर प्रतिनिधी)- पोलिसांनी पाठलाग केल्याने व वाळूने भरलेल्या वाहनाला कट मारल्याने देवगड येथे अपघात झाला. या अपघातास या दोघा पोलिसांसोबत पिकअपचा मालक व त्यांचे दोन साथीदार जबाबदार आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी मदत करण्याऐवजी या दोघा पोलिसांसह वाळूतस्करांनी पळ काढला. हे पाचही जण माझ्या पतीच्या व इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याने या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मयत वाहन चालकाच्या पत्नीने तालुका पोलिसांकडे केली आहे.संगमनेर तालुक्यातील देवगड फाट्याजवळ वाळूने भरलेली पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात पडल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता वादग्रस्त होत चालले आहे. पोलिसांनी पाठलाग केल्यामुळेच या वाहनाचा अपघात झाला होता. अशी चर्चा होत असताना मयत वाहनचालकाची पत्नी बुशरा परवेज सय्यद व मामा जमशीद आय्युब शेख यांनी तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन थेट पोलिसांचे नाव घेऊन आरोप केला आहे.वाहनचालकाची पत्नी बुशरा परवेज सय्यद हिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 28 जून रोजी रात्री 2 वाजता मोईन फारुख पठाण, भैय्यू उर्फ इस्माईल शेख, आवेज नासिर शेख (सर्व रा. नाईकवाडीपुरा, संगमनेर) हे आमच्या संगमनेर खुर्द येथील घरी आले. पतीस झोपेतून उठून वाळूने भरलेली गाडी घेऊन जाण्यास सांगितले. पतीने नकार दिला असता दमदाटी व शिवीगाळ करून गाडी घेऊन जाण्यास सांगितले.आपला पती वाळू भरलेली पिकअप घेऊन जात असताना दोन पोलीसांनी त्यांच्या वाहनातून वाळूच्या पिकअपचा जोर्वे नाका ते देवगड मंदिरापर्यंत पाठलाग केला. ते सफेद रंगाच्या झायलो गाडीमधून पाठलाग करत होते. (या गाडीचा क्रमांकही या तक्रार अर्जात दिला आहे.) पोलीस पाठलाग करत असल्यामुळे पतीने आपल्या वाहनाचा वेग वाढविला. पोलिसांनी पिकअपला कट मारल्यामुळे वाळूने भरलेली पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात पडली. या अपघातात माझा पती व दोन मजुरांचा मृत्यू झाला.अपघातात जखमी असलेल्या अक्षय माळी या मजुराने पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र अपघात पाहून त्यांनी पोबारा केला. काही वेळानंतर मोईम पठाण व अन्य त्याचे साथीदारही घटनास्थळी आले. मात्र त्यांनीही मदत न करता पळ काढला. या अपघातास पोलीस व संगमनेरचे वाळूतस्कर जबाबदार असल्याने या सर्वांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी बुशरा या महिलेने केली आहे.पोलिसांनी पाठलाग केल्यामुळे हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप अपघातातील मयत वाहनचालकाच्या पत्नीने केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बाहेरील पोलीस मध्यरात्री संगमनेरात कशासाठी आले होते? अवैध वाळू उपशाबाबत कारवाईचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा प्रश्न विचारला जात आहे. हे पोलीस ज्या झायलो वाहनातून पाठलाग करत होते ते वाहन नेमके कुणाचे होते? वाहन मालकाने या पोलिसांना वाहन का दिले? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यास अनेक गंभीर बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.अपघातातील मयत वाहनचालकाची पत्नी व काही ग्रामस्थ तालुका पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली. संतप्त ग्रामस्थ तब्बल तासभर पोलीस ठाण्याच्या आवारात थांबले. मात्र एकाही अधिकार्याने त्यांची भेट घेतली नाही. यानंतर या ग्रामस्थांनी नायब तहसीलदारांकडे निवेदन दिले.
Post a Comment