श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर नगरपरिषदेचे प्रशासन भाजी विक्रेते आणि शेतकर्यांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केला आहे. भाजी विक्रेते शेतकरी व छोट्या व्यावसायिकांनी आ. लहू कानडे आणि उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून करोना आजारामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली.दरम्यानच्या काळात अनेक छोट्या मोठ्या व्यापार्यांसह शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपासून संचारबंदी शिथील करत शासनाने अनेक छोटे व्यवसाय चालू केले आहेत. त्यानुसारच भाजी विक्रेते शेतकरी व व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत. मात्र नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत. भाजी विक्रेते शेतकरी व व्यावसायिकांना दमदाटी करणे, दंड वसूल करणे, शेतमाल जप्त करणे अशा प्रकारच्या कारवाया पालिका प्रशासन करीत आहे. पालिका प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे भाजी विक्रेते आणि शेतकर्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले आहे.संचारबंदीमध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागत असल्याने बर्याचशा नागरिकांनी भाजी विक्रीचा पर्याय निवडून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पालिका प्रशासनाने भाजी विक्रेते आणि शेतकर्यांना शेतमाल विक्रीसाठी फक्त जागा निश्चित केली. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याबद्दल कुठलेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे दिवसभर भाजी विक्री करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणार्या भाजी विक्रेत्यांवर पालिका प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा फटका बसत आहे.भाजी विक्रेत्यांबाबत योग्य नियोजन केल्यास एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळता येईल आणि ग्राहक व विक्रेते यांना देखील सोयीचे होईल. त्यामुळे भाजी विक्रेते व शेतकरी यांच्यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा. त्याकरिता नियोजनबद्ध आराखडा तयार करुन भाजी विक्रेत्यांना दिलासा द्यावा अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस नगरसेवक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील, असा इशारा देखील उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिला आहे.
Post a Comment