अहमदनगर (प्रतिनिधी)- दौंड रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नगर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी हॉटेलचा मालक, मॅनेजरसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार ज्ञानेश्वर खिळे यांनी फिर्याद दिली आहे.लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असली तरी अद्याप हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नाही. हॉटेल बंदी असताना नगरमध्ये चक्क हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या पार्लरवर छापा टाकून हॉटेलचा मालक सतीश किसनराव लोटके, मॅनेजर अरुण बाबासाहेब डमडेरे यांच्यासह एकूण 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.दौंड रोडवर अरणगाव येथे एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर व दारू विक्री सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा याठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी दोन सीलबंद सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचे बॉक्स, सहा अर्धवट वापरलेले तंबाखूजन्य पदार्थांचे बॉक्स, साडेतीन हजार रुपयांचे हुक्का स्पॉटचे सात संच, सात बाटल्या विदेशी मद्य आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.हॉटेल मालक असलेले सतीश लोटके हे नाट्य कलावंत असून, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आहेत. तसेच हॉटेल मालकाचे जवळचे नातेवाईक एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच इतर आरोपी देखील मोठ्या घरचे आहेत. या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन असतानाही हा प्रकार करण्याचे धाडस झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यास राजकीय पाठबळ होते का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. किती दिवसांपासून हे सुरू होते, याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. हॉटेलमध्ये हुक्का बरोबरच मद्यविक्री सुद्धा सुरू असल्याचे आढळून आले आहे.आरोपी सर्व नगरचे असून यामध्ये हॉटेलचा मालक सतीश किसनराव लोटके, मॅनेजर अरुण बाबासाहेब डमडेरे, श्रेयस संजय कोठरी, अभिषेक अदाके संचेती, घनश्याम बारुक ठोकळ, किरण छगनराव निकम (बुरुडगाव रोड), रमेश प्रमोद शहा (कापड बाजार), आदित्य सतीश ईदानी (महेश टॉकीज मागे), मोहित कृष्णकांत शहा, रोहित नितीन शहा (खिस्त गल्ली), अंकित महेश लुणिया (माळीवाडा), अंकित अमृतलाल कोठारी (वसंत टॉकीज जवळ), गणेश संजय डहाळे (तोफखाना), दीपक जितेंद्र गिडवाणी (शीला विहार), यश कन्हैयालाल लुभिया (मिस्किन नगर), आदित्य गोरख घालमे (गुजर गल्ली), करण विजय गुप्ता (गंजबाजार), किसन चंद्रकुमार माखिजा (प्रोफेसर कॉलनी) व दोन मुली अशा 20 जणांचा समावेश आहे.
Post a Comment