बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याचा प्रसार, प्रचार व शहर सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकात गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बसविण्यात आलेल्या बिबटच्या पुतळ्याचे अनावरण लॉकडाउनमूळे लांबणीवर पडले आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्टेट बँक चौकातील अस्वलाच्या पुतळ्याचे काम रखडले आहे.
बुलडाणा शहरापासून 12 किलोमीटरवर ज्ञानगंगा अभयारण्य आहे.ज्ञानगंगा नदीच्या उगमस्थान लगतच्या 206 चौरस किलोमीटरच्या वन क्षेत्राला 9 मे 1997 रोजी राज्य शासनाने वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देत "ज्ञानगंगा अभयारण्य" असे त्याचे नामकरण केले.अस्वलासाठी प्रसिद्ध असल्याने येथे विदेशी पर्यटकांची रेलचेल असते.जिल्हा मुख्यालयी बुलडाणा शहरात येणाऱ्या लोकां पर्यंत अभयारण्याचा प्रसार, प्रचारासाठी व शहरातील सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी वन्यजीव विभागाने जिल्हा वार्षीक योजनेतून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये खर्ची घालून शहरात 2 ठिकाणी बिबट व अस्वल यांचे विलोभनीय पुतळे बसविण्यात येत आहे.वन्यजीव कार्यालय जवळ त्रिशरण चौकात बिबट्याचा टूमदार ऐट असलेला पुतळा रंगरंगोटी करुन अनावरणाच्या प्रतिक्षेत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय समोर उभारण्यात येणारे अस्वलाच्या पुतळ्याच्या कामाला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी रस्त्याला अडथळा निर्माण होईल असे कारण पुढे करत सदर अस्वलाच्या पुतळ्याचा काम थांबवून दिला आहे.असे असले तरी, त्रिशरण चौकात बनविलेल्या बिबट्याच्या पूतळ्याचे अनावरण कधी होणार असा प्रश्न वन्यप्रेमींना पडला आहे.झाकुन ठेवलेल्या या बिबट्याला लवकर बाहेर काढावे अर्थात त्या पुतळ्याचे अनावरण करावे असा सूर उमटू लागला आहे.

Post a Comment