मुंबई - कोरोनाची लक्षण असूनही चार पालिका रुग्णालयांनी दाखल करून घेण्यासाठी नकार दिलेला पोलिसाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. एका वरिष्ठ अधिका-यांनी त्याला दुजोरा दिला आहे. या पोलिसाला उपचारासाठी चार सरकारी रुग्णालयात फिरायला लागले. कोणीच त्यांना रु्ग्णालयात दाखल करून घेतले नाही, अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांना रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात केले होते.संबंधीत पोलिस हवालदार कुर्ला वाहतुक विभागात कार्यरत आहेत. त्यांना सोमवारी (ता.20) ताप आल्यामुळे त्यांनी स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले. पण फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. याबाबत त्यांनी मुलाला सांगितल्यानंतर त्यांचा मुलगा आजारी वडिलांना घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेला. तेथील डॉक्टरांनी या पोलिसाला जागा नसल्यामुळे तुम्ही नायर रुग्णालयात जा, असे सांगितले. त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही व बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले.त्यानंतर या आजारी पोलिसाचा मुलगा त्यांना वडिलांना घेऊन परळ येथील केईएम रुग्णालयात गेला. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. सगळीकडे हेळसांड झाल्यानंतर केईएम रुग्णालयात तरी वडिलांना दाखल करण्यात येईल, असे त्यांना वाटले. पण तेथेही डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही व जागा नसल्यामुळे तुम्ही कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले. सगळीकडून भरती करण्यास नकार देण्यात आल्यामुळे अखेर त्यांनी वरिष्ठांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या पोलिसाच्या वरिष्ठांनी केईएम रु्गणालय ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते अशा भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला व घडलेल्या सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला.अखेर भोईवाड्यातील पोलिसांनी विनंती केलयानंतर या पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या पोलिसाचा कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
Post a Comment