श्रीरामपूर (प्रतिनिधी) देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील निजामुद्दीन मर्कज मध्ये तब्लिगी जमातच्या झालेल्या कार्यक्रमानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे कारण देऊन यानिमित्ताने हिंदू-मुस्लीम जातींमध्ये विसंवाद घडवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असून याबाबत पोलिसांनी योग्य ती पावले उचलण्याची मागणी विविध समाज घटकांकडून करण्यात येत आहे . तब्लिग जमाती च्या कार्यक्रमानंतर देशातील संपूर्ण मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्याने देशभरात तो एक चर्चेचा विषय झाला आहे . यालाच अनुसरून सोशल मीडियावर वेगवेगळे प्रकारचे फोटो परावर्तित करून वेगवेगळ्या कार्यक्रमाचा संबंध तब्लिग जमातीशी जोडून त्याप्रमाणे पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत . अशीच एक पोस्ट अहमदनगर मधील मोहन कृष्णाजी वाघ नावाच्या व्यक्तीने पसायदान आणि वि नि कोल्हे मित्रमंडळ या दोन ग्रुप वर वायरल केली . त्यामध्ये मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असा मजकूर टाकलेला आहे .कोणीही आणि कितीही जवळचा मुस्लिम समाजातील माणूस तुमच्या संपर्कात असेल तर त्याला जवळ येऊ देऊ नका . वरील व्हिडीओ बघा . हा निजामुद्दीन मर्कज मधला आहे . असल्या प्रकारे यांची कोणतीही नमाज किंवा प्रार्थना करण्याची पद्धत नाही . हा प्रकार हवेमधील कोरोनाचे विषाणू स्वतःमध्ये लागण होण्यासाठी केला जातोय आणि हेच लोक उद्या आपल्या जवळ येऊन आपल्याला पण कोरोना बाधित करतील . हा त्यांचा नवीन जिहाद आहे . तेव्हा सर्वांना विनंती आहे की मुस्लीम लोकांपासून दूर राहा . त्यांच्या कसल्याही प्रकारे संपर्कात येऊ नका . त्यांच्याशी सामान खरेदी टाळा . असे त्या पोस्टमध्ये नमूद केले आहे .असाच दुसरा एक प्रकार नांदेड येथील एका व्यक्तीने एका ग्रुपवर केला असून त्यामध्ये दिल्ली येथे झालेल्या तब्लिगी जमात च्या कार्यक्रमात नांदेड मधून शंभर लोक सहभागी झाले असून त्यातील काहींना कोरोणाची लागण झाली आहे . तेव्हा मुस्लिमांपासून दूर राहा . त्यांच्या जवळ जाऊ नका . त्यांच्याशी व्यवहार करू नका . अशा प्रकारच्या भाषेत या मेसेज पोस्ट केलेला आहे . दोन्ही पोस्टमध्ये दाखविलेले व्हिडिओ आणि फोटो हे तब्लिग जमातीशी संबंधित नाहीत हे विशेष .
सदर पोस्ट व्हायरल झाल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून कोणत्या व्यक्ती अशाप्रकारे स्वतःचे मरण ओढवून घेईल का ? असा प्रश्न विचारला जात आहे . सोशल मीडिया मध्ये अशा प्रकारच्या पोस्ट येत असल्याने समाजातील सामाजिक वातावरण दूषित होऊन हिंदू-मुस्लिम तेढ वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे . नगर येथील व्यक्तीने टाकलेल्या पोस्ट बद्दल श्रीरामपुरात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुस्लिम समाजातील काही तरुणांनी सांगितले .
सध्या जिल्हा व पोलिस प्रशासन आजाराचा मुकाबला करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करीत असताना प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी अशाप्रकारे सामाजिक व जातीय तेढ वाढवून वातावरण खराब करण्याच्या प्रकाराचा मुशायरा कमिटी, उम्मती सोशल वेल्फेअर फाउंडेशन, मिल्लत फाउंडेशन, परिवर्तन मंच, अहमदनगर जिल्हा ऊर्दू साहित्य परिषद आदी संघटनांनी निषेध केला असून समाजामध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरवून वातावरण दूषित करणाऱ्या घटकांविरुद्ध पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे .
Post a Comment