बेलापूर : संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून प्रत्येकाने स्वसंरक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे सार्थक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शकील बागवान यांनी म्हटले आहे.
उंबरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे मोफत मास्क वाटप करण्यात आले त्याप्रसंगी बागवान बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका मीना मंडोरे होत्या.यावेळी माजी सरपंच राजेंद्र ओहोळ,सरपंच चिमाजी राऊत,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुनील काळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पालकांना कोरोना आजाराचा प्रसार कसा होतो हे स्पष्ट करून त्याचे गांभीर्य सांगितले. त्याचवेळी प्रत्येकाने कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगितले. प्रत्येक नागरिकांसाठी त्यांचे घर हे सर्वाधिक सुरक्षित स्थळ आहे,अडचणीच्या प्रसंगी व महत्वाच्या कामाशिवाय घर न सोडण्याचे आवाहन शकील बागवान यांनी केले.दिवसातून दर दोन-तीन तासांनी हात साबणाने स्वच्छ धुणे, शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरणे, किंवा स्वतःच्या बाहूवर असलेल्या कपड्यावर शिंकणे करावे, तोंड,नाक व कानाला सातत्याने हात न लावणे,गरजे प्रसंगी एकत्र आल्यानंतर एकमेकांमध्ये किमान तीन फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन बागवान यांनी केले.
तसेच उपस्थित सर्वांच विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले.यावेळी श्रीमती लता पालवे,मेघा साळवे, डॉ.रामकृष्ण जगताप,संघमित्रा रोकडे, संतोष जमदाडे आदी उपस्थित होते.
Post a Comment