अहमदनगर दि.२८- नगर-मनमाड महामार्गावरील गुहा गावाच्या शिवारात ट्रक चालकाला मारहाण करून लुटणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यात यश आले आहे. संतोष राजेंद्र विधाते (वय २४), सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० सर्व रा.वरशिंदे, ता.राहुरी) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२१ एप्रिलला पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास साताराला जात असताना ट्रक पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाच्या शिवारात साई गंगा हाँटेलजवळ ट्रक थांबवली. या दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञातांनी दमदाटी करून जवळील रोख रक्कम, मोबाईल असा एकूण १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात ट्रकचालक विशाल श्रीराम वाडेकर ( रा.मोहाडी पिंपळादेवी, जि.धुळे) यांनी दिली होती. या गुन्हाता तपास सुरू असताना, हा गुन्हा संतोष विधाते याने व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार राहुरी येथे जाऊन शोध घेऊन आरोपी संतोष विधाते याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी पकडले. संतोष याला विचारणा केली असता,त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस खाक्या दाखविताच, सदरचा गुन्हा हा साथीदार सागर विधाते व आप्पासाहेब वाडकर सर्वांनी सागर यांच्या स्पलेंडर मोटारसायकलवर जाऊन केलीची कबुली दिली. यानंतर उर्वरित सागर सिताराम विधाते (वय ३०), आप्पासाहेब केशव वाडकर (वय ३० दोघे रा.वरशिंदे, ता.राहुरी) याचा शोध घेऊन पकडण्यात आले.यावेळी चोरलेली रक्कम खर्च केल्याचे आरोपींनी सांगितले, ५ हजार रुपयाचा एम आयचा मोबाईल, स्पलेंडर गाडी (एमएच १७, एआर ३३३४) असा एकूण ३५ हजार रु. मुद्देमाल हस्तगत केला. पकडण्यात आलेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासासाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे-कांबळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रवि सोनटक्के, चालक पोहेकाँ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.
Post a Comment