शिर्डी/प्रतिनिधि जय शर्मा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये विविध उपाययोजनांचे आदेश पारित केले असून त्याची जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासोबतच जिल्हयामध्ये लॉकडाऊन आणि संचारबंदीचे निर्बंध लागू करण्यात आले असून इतर जिल्हयातून अहमदनगर जिल्हयात पर्यायाने तालुक्यात नागरिकांच्या विनापरवाना ये-जा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभममीवर काही नागरिक अथवा स्थानिकांचे नातेवाईक, पाहुणे बेकायदेशीरपणे राहाता तालुक्यात प्रवेश करत असल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही कृती आक्षेपार्ह असून शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी आहे.
राहाता तालुका अथवा परिसरात नवीन व्यक्ती, बाहेरगावचे पाहूणे आल्यास स्थानिकांनी यासंबधीची माहिती तात्काळ तालुका प्रशासनास अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावी, जेणेकरून संबंधीताची चौकशी करून योग्य ती वैद्यकीय कार्यवाही करता येईल व संभाव्य धोका टाळता येईल. बाहेरगावाहून आलेल्यांची माहीती लपवून ठेवल्यास संबधितांविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. मदतीसाठी तालुका नियंत्रण कक्ष येथे दूरध्वनी क्रमांक क्र.02423-242853 वर संपर्क साधावा. नागरिकांनी घरातच राहून स्वत:ची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
प्रशासनातील सर्व यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.
Post a Comment