मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांनी घरातच राहावे, यासाठी पोलिस जिवाची पर्वा न करता रस्त्यांवर पहारा देत आहेत. अशा एका आजारी पोलिसाला दाखल करून घेण्यास महापालिकेच्या चार रुग्णालयांनी नकार दिला. अखेरीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर या आजारी पोलिसाला मंगळवारी रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिस दलात नाराजी आहे.कुर्ला वाहतूक विभागातील एका पोलिस हवालदाराने सोमवारी (ता. 20) ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना सात रस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे ते मुलाला सोबत घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी रुग्णालयात जागा नसल्यामुळे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जाण्याची सूचना केली.त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले; मात्र तेथील डॉक्टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही आणि परळच्या केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानंतर या आजारी पोलिसाला घेऊन त्यांचा मुलगा केईएम रुग्णालयात गेला. तोपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. आता तरी वडिलांना उपचार मिळतील, असे त्यांच्या मुलाला वाटले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही आणि जागा नसल्यामुळे पुन्हा कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची मध्यस्थी हवालदिल झालेल्या या पोलिस हवालदाराने अखेरीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वरिष्ठांनी भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. भोईवाडा पोलिसांनी विनंती केल्यानंतर या आजारी पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 20 मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात नाराजी पसरली आहे. सध्याच्या काळातही पोलिसाला अशी वागणूक मिळत असेल; तर सामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Post a Comment