शिर्डी - लॉकडाऊन संपलेनंतर व संपुर्ण जनजीवन सुरळीत झालेनंतर रक्ताची गरज भासण्याची शक्यता असल्यामुळे नियमित रक्तदान करणा-या रक्तदात्यांना व रक्त संकलन करणा-या संघटनांनी आपले नावं, मोबाईल नंबर, रक्तगट श्री साईनाथ रक्तपेढी, शिर्डी येथे नोंदवावीत असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
श्री.डोंगरे म्हणाले, सध्या महाराष्ट्र शासनाकडून विविध सामाजिक संस्था व संघटंना रक्तदान शिबीराचे आयोजन करणेबाबत सूचना देणेत येत आहेत. याकरीता असंख्य रक्तदाते स्वतःहुन रक्तदान करणेकामी पुढे येत असले तरी कोरोना विषाणु हा फुप्फुसाचा आजार असलेमुळे त्यासाठी रक्ताची फारशी गरज भासत नाही. तसेच आजतागायत श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे वारंवार होणारे रस्ते अपघात हे पुर्णपणे थांबलेले आहेत. तसेच तातडीची आवश्यकता सोडून इतर रुग्णांना रुग्णालयात न जाण्याच्या सूचना देखील सरकारी पातळीवर देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे दैनंदिन अथवा प्लॅन शस्त्रक्रिया या सध्यास्थितीला पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे म्हणावी तितकी रक्ताची गरज रुग्णालयास भासत नाही.
तसेच सर्वसाधारणपणे रक्तदानानंतर विविध प्रकारच्या चाचण्या होऊन ते रक्त ३५ दिवस रक्तपेढीमध्ये साठवले जाते. रक्ताची मागणी बघता व त्याची टिकाऊ क्षमता पाहता रक्तसाठा सांभाळणे अवघड आहे. मागणी नसेल तर दात्यांचे हे अमुल्य रक्त वाया जाण्याची शक्यता आहे. रक्तदात्याने एकदा रक्त दिल्यानंतर पुढील तीन महिने रक्तदान करु नये असा नियम आहे. त्यामुळे आता गरज नसताना रक्तदान केले तर अशा नियमित रक्तदात्यांची टंचाई ही लॉकडाऊन संपलेनंतर व संपुर्ण जनजीवन सुरळीत झालेनंतर भासण्याची शक्यता आहे.
याकरीता नियमित रक्तदान करणा-या रक्तदात्यांनी, ज्यांना रक्तदान करावयाची इच्छा आहे व रक्त संकलन करणा-या संघटनांनी आपले नावं, मोबाईल नंबर, रक्तगटासह श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रक्तपेढी, शिर्डी येथे नोंदवावेत जेणे करुन रक्ताची टंचाई भासल्यास रक्तदात्यांना संपर्क करुन रक्त उपलब्ध करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीकरीता (०२४२३) २५८५२५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावे असे ही श्री.डोंगरे यांनी सांगितले.
Post a Comment