![]() |
(भारतकुमार उदावंत व रवी भागवत) |
कोरोनाने जगभर हाहाकार माजविलेला असतानाही शहरी व ग्रामीण भागातील अनेक लोक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरून सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवताना दिसत आहेत, त्यांच्या या कृत्यामुळे ते त्यांच्यासोबतच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. आशा महाभागांना कोरोनाच्या भयावह वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी भागवत व उदावंत यांनी व्यंगचित्रांचा मार्ग निवडला. त्यास दोघांनीही समर्पक घोषवाक्य व वातरतीकांची जोड दिली.
उदावंत व भागवत यांच्या व्यंगचित्रात यमराज केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून त्यास त्यांनी कोरोनाचे रूप दिले आहे. आता तरी हो 'शहाणा, बाहेर जाण्यास नको शोधू बहाणा', 'घरात थांबणे हीच खरी देशसेवा', 'गर्दी आहे कोरोनाचे ठिकाण, त्यापेक्षा पसंत करा मकान', 'रस्त्यांवर फिरणाऱ्या मूर्खांचा जिरेल माज, घरी बसणाऱ्याना मिळणार दीर्घायुष्याचा ताज', 'कचरा टाकलं उघड्यावरी, विषाणू येतील तुमच्या घरी', ,'बचना है, बाचाना है, घरमे रहकर कोरोना को हराना है', ;करोनाशी द्यायची आहे फाईट, त्यासाठी घरी राहणे काय आहे वाईट', आशा एकचढ एक घोषवाक्ये व वात्रटिकांच्या मदतीने दोघांचेही समाजप्रबोधन सुरू आहे. ही घोषवाक्ये मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी असल्याने व्हाट्सआप, फेसबुक, ट्विटर, हॅलो, शेयरइट, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांमधून त्यांच्या या उपक्रमास मोठी पसंती मिळत आहे. राज्याबरोबरच गुजरात, कर्नाटक, हायद्राबाद आदी ठिकाणाहून अनेक चाहत्यांनी त्यांना दूरध्वनी करून कामाचे कौतुक केले असल्याचे उदावंत यांनी संगीतले.
गुरू-शिष्याच्या या जोडीने यापूर्वीही अनेकदा आपल्या कलेचा उपयोग करून समाजातील गरजूंना मदत उभी केली आहे. चार वर्षांपूर्वी चैताली येतील दीपक राजगुडे या ब्लड कॅन्सरच्या रुग्णासाठी दोघांनी रस्त्यावर उतरून लोकांची चित्रे काढली, त्यास कला रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला त्यानंतर नांदूर येथील मनीष सादाफळ या या प्लास्टिक ऍनिमिया च्या रुग्णासाठी तसेच भोकर येथील रामकृष्ण भोईटे या दाम्पत्याच्या अनाथ मुलांसाठीही असाच उपक्रम राबविला. त्यांनी आशा उपक्रमातून आतापर्यंत एक लाखाहून अधिक राशी उभारली व संपूर्ण रक्कम संबंधितांना शासकीय अधिकाऱ्यांमरफत सुपूर्द केली आहे.
याशिवाय चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ते सातत्याने जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमोर व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके सादर करतात. पन्नास हुन अधिक शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांनी आतापर्यंत आपली प्रात्यक्षिके सादर केली आहेत. याशिवाय अनेक दैनिके, मासिके व दिवाळी विशेषांकातून त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होत असतात. दोघेही सातत्याने व्यसनमुक्ती, हुंडाबळी, विजबचत, पाणी बचत, एड्स जनजागृती, वृक्ष बचाव आदी सामाजिक विषयांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रबोधन करीत असतात.आतापर्यंत त्यांच्या व्यंगचित्रांची मुबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, सोलापूर आदींसह अनेक ठिकाणी प्रदर्शने भरली आहेत. उदावंत यांच्या गणपती व मूषक यांच्या व्यंगचित्र मालिकेचे राज्यात एकाच वेळी शंभर ठिकाणी प्रदर्शने होण्याचा विक्रम झाला आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन राज्यसरकारने त्यांना २००९ साली महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने सन्मानीतही केले आहे. उदावंत यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन दोन वर्षांपूर्वी मुंबई येथील जहांगीर कलादालनात भरले होते. त्यासही त्यावेळी मोठा प्रतिसाद लाभला. भागवत यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या 30 पुस्तकांची महाराष्ट्र शासनाने प्रगत शिक्षण महाराष्ट्र या योजनेसाठी गेल्यावर्षी निवड केली होती. तसेच या दोघांच्याही पाठीवर कलारसिक माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची थाप पडली आहे.
सत्यजितचेही पाऊलावर पाऊल
भरतकुमार उदावंत यांचा मुलगा सत्यजित हादेखील उत्कृष्ट उदयोन्मुख चित्रकार आहे. काही वर्षांपूर्वी चित्रकलेच्या फाउंडेशन परीक्षेत तो राज्यात पहिला आला होता. समाजप्रधानाच्या कार्यात त्याने उदावंत भागवत या गुरुशिष्याच्या पाऊलावर पाऊल ठेवले आहे. त्यानेही हा महामारीच्या काळात डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्या कार्यास सॅल्युट करणारे चित्र रेखाटले आहे, त्याच्या या चित्रासदेखील कलारसिकांची मोठी पसंती मिळत आहे.
Post a Comment