मुंबई - मानसिक तणावाखाली आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचे पोलिसाने प्राण वाचवले. रात्रपाळीला पोलीस कर्तव्याच्या ठिकाणी जात असताना सदर घटना घडली होती. महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल "खाकीतल्या देवदुता"चे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
कोरोनाचे सावट असल्याने सर्वत्र लॉकडाऊन आहे. मात्र पोलीस दिवस-रात्र कर्तव्य बजावत आहेत. त्यापैकी एक असलेले पोलीस शिपाई (बक्कल नं. 093566) श्रीकांत शिवाजी देशपांडे हे राहत्या घरातून (एमआरए मार्ग पोलीस लाईन येथून) मालाड पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पोशि देशपांडे हे जे. जे. पुलाजवळ येताच एक महिला पुलावरील लोखंडी (स्पीड दर्शक खांब) खांबाच्या आधारे पुलावर चढण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून पोशि देशपांडे यांनी तात्काळ दुचाकी थांबवून पुलावर चढणाऱ्या महिलेला रोखले.
ऐकण्याच्या मन:स्थितीत नसलेल्या महिलेने खांबाला घट्ट पकडून ठेवले होते. मानसिक संतुलन बिघडलेली महिला पोशि देशपांडे यांनाच उलटसुलट बोलू लागली. मात्र पोशि देशपांडे यांना महिलेची समजूत काढली व तात्काळ 100 नंबरवर फोन करून सर्व हकीगत सांगितली. नेमकी त्यावेळेस गस्त घालणाऱ्या वाहतूक पोलीस विभागाची गाडी पुलाजवळ आली. दरम्यान, पोलीस मुख्य नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश जारी होताच एमआरए मार्ग पोलिसांचे पथक तात्कळ घटनास्थळी दाखल झाले. पोशि श्रीकांत देशपांडे यांनी सर्व हकीगत सांगून महिलेला एमआरए मार्ग पोलिसांच्या ताब्यात देऊन कर्तव्य बजावण्यासाठी मालाड पोलीस ठाण्याच्या दिशेने निघून गेले.आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे दोन लग्न झाल्यामुळे व सततच्या कौटुंबिक वादामुळे महिला हताश झाली होती. त्यामुळे मानसिक तणावामुळे महिलेचे संतुलन बिघडले होते, अशी माहिती चौकशीदरम्यान उजेडात येताच पोलिसांनी महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावून तिला त्याच्या ताब्यात दिले. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या महिलेला रोखून जीवनदान दिल्याबद्दल उदगिरचे (जि. लातूर) सुपुत्र पोलीस शिपाई श्रीकांत देशपांडे यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी, सामाजिक संस्थांनी व मित्रमंडळींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या, सत्कार केला.
Post a Comment