नेवासे येथील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण.
अहमदनगर : जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण नेवासा तालुक्यातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कातील इतर नागरिकांना तपासणीसाठी प्रशासनाने हालचाली केल्या आहेत. या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे कोरोनाबाधितांची नगर जिल्ह्यातील संख्या आता २८ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी एका व्यक्तीचा स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर ५० वर्षीय व्यक्ती नेवासे शहरातील असून त्याला सर्दी, दम लागणे आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. दिनांक ११ एप्रिल रोजी या व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुना चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते, तो अहवाल आज प्राप्त झाला. त्यात ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान, कालच या व्यक्तीचा एक्स रे काढण्यात आला होता. त्यात त्याला न्यूमोनिया झाल्याचे तसेच सारीसदश्य आजाराची लक्षणे आढळल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज सकाळी या व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत तात्काळ ससून रुग्णालयास देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी सांगितले.जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आज, सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत ११२३ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १०१६ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले असून सध्या ७३ अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच एकूण २८ कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात बीड येथील आष्टी तालुक्यातील एक व्यक्ती आणि मुळची श्रीरामपूर तालुक्यातील परंतू ससुन मध्ये उपचार घेणारी अशा दोन व्यक्तींचा समावेश आहे. ससून मध्ये उपचार घेणार्या व्यक्तीचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्या वैदयकीय देखरेखीखाली ७६ जणांना ठेवण्यात आले असून ४४९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर ६७९ जणांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील संशयितांचे अहवाल शनिवारी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी रविवारी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र सोमवारी सकाळी काही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्ण हा नेवासा तालुक्यातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यात शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यादृष्टिने पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. आता या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण-कोण आहेत, त्याचा शोध प्रशासन घेत आहे.
Post a Comment