शिर्डी,प्रतिनिधि राजेंद्र गडकरी )-महाराष्ट्र शासनाने 20 एप्रिल,2020 पासून काही ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध अंशत: शिथिल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्याच्या लॉकडाऊनसंदर्भातील भ्रम दूर होण्याच्यादृष्टीने सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, तालुक्यातील लॉकडाऊन स्थिती पुर्वीप्रमाणेच 3 मे, 2020 पर्यंत कायम राहणार असून जनतेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून येथून पुढेही असेच सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.
या कालावधीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद राहणार असून प्रवासी टॅक्सी, बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस, औद्योगिक आस्थापना, सिनेमा थिएटर, मॉल, व्यायामशाळा, स्विमींग पुल, मनोरंजन केंद्र, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजनाच्या व धार्मिक कार्यक्रमास प्रतिबंध असून सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळी सामुदायिक कार्यक्रम, पुजा पाठ, नमाज पठण करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्यविधी जास्तीत जास्त 20 व्यक्तिंच्या उपस्थितीमध्ये, सामाजिक अंतर राखूनच पार पाडावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा जसे रूग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, पॅथालाजीकल लॅबोरेटरी, जनावरांची दवाखाने व औषधी दुकाने, शेतीपूरक व्यवसाय, खते-बी बियाणे, किडनाशक औषधी दुकाने, किराणा, भाजीपाला फळे, धान्य, दुध दुकाने, रेशन दुकाने केवळ निर्धारित वेळेतच चालू राहतील. घरोघरी, हातगाडीवर, फेरीवाल्यांद्वारे भाजीपाला विक्रिसाठी मुभा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना मास्क वापरणे तसेच किमान दिड मिटरचे आपापसात अंतर राखणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध असून असे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या सूचनांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करावे, अत्यंत निकडीचे कामासाठीच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच निकडीचे कामासाठी घराबाहेर जायचे असल्यास वाहनाचा वापर टाळावा. जीवनावश्यक वस्तू घरपोहोच उपलब्ध होण्याची सुविधा नागरिकांनी जास्तीत जास्त वापरावी, साथ रोग कायदा,1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 मधील तरतूदींचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा भारतीय दंड संहितेतील कलमान्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल असे, तहसीलदार कुंदन हिरे यांनी कळविले आहे.
Post a Comment