( शिर्डी,जय शर्मा ):-कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजू लाभार्थींना अन्नधान्य मिळण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनासुध्दा मे व जून,2020 साठी गहू व तांदुळ वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिमाह प्रतिव्यक्ती 8 रुपये किलो दराने 3 किलेा गहू आणि प्रतिमाह प्रतिव्यक्ती 12 रुपये किलो दराने 2 किलो तादूळ वितरीत करण्यात येणार आहे केशरी शिधापत्रिकाधारक शिधापत्रिका घेऊन आल्यावर स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकेवरील व्यक्ती संख्या तपासून, देय असलेल्या धान्याच्या परिमाणाची शिधापत्रिकेच्या मागील पानावर शिक्का मारुन नोंद घ्यावी. शिधापत्रिकाधारकाला धान्य वितरण केल्यानंतर विहित नमुन्यातील नोंदवहीमध्ये नोंदी अद्ययावत करण्यात याव्यात. धान्य वाटप पूर्ण झाल्यानंतर दैनंदिन प्राप्त धान्य, धान्याची विक्री, शिल्लक साठा याबाबतचा गोषवारा नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. गांवपातळीवरील क्षेत्रीय अधिकारी तसेच पालक अधिकारी यांनी दररोज याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन धान्य साठा प्रत्यक्ष मोजून नोंदवहीत स्वाक्षरी करावी. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता क्षेत्रीय अधिकारी व पालक अधिकारी यांनी घ्यावी. धान्य वाटपाबाबत गांवामध्ये, स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यात यावी. केशरी शिधायपत्रिकाधारकांना देय असलेल्या धान्याचा पुरवठा लवकरच करण्यात येणार असून, धान्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात यावे. सदरील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. यामध्ये हयगय अथवा टाळाटाळा केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम,1955, नैसर्गिक आपत्ती अधिनियम,2005 अन्वये संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
Post a Comment