ना. भुजबळ यांच्या हस्ते राज्य राखीव पोलीस दल संकुलाचे उद्घाटन,पोलीस विभागाच्या कर्तव्य दक्षतेमुळेच देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था व शांतता अबाधित-राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ.

मालेगाव । प्रतिनिधी -पोलीस विभागाच्या कर्तव्य दक्षतेमुळेच देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था व शांतता अबाधित राखली जात असल्याने सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वातावरणात राहता येते, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.येथील राज्य राखीव पोलीस दल संकुलाचे उद्घाटन व हस्तांतरण ना. भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री दादा भुसे तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर ताहेरा शेख, राज्य राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, धुळ्याचे समादेशक संजय पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अधिक्षक अभियंता वृषाली जोशी आदी उपस्थित होते.अतीसंवेदनशील शहर म्हणून मालेगाव येथे एसआरपीएफ जवानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात ठेवून संरक्षण व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे सांगून ना. भुजबळ पुढे म्हणाले, पोलीस दल नागरीकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सेवा बजावते. त्यामुळे नागरीकांना सुसह्य जीवन जगता येते. पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असतांना त्यांच्या मुलभूत गरजांची पुर्तता करणेही आवश्यक असून त्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.पोलीस विभागातून दरवर्षी ज्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्याच प्रमाणात दरवर्षी पोलीस भरतीत सातत्य राखणे देखील आवश्यक असल्याचे सांगत ना. भुजबळ म्हणाले की, देशांतर्गत संरक्षणासाठी पोलिसांची जबाबदारी मोठी आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची मागणी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलीस विभागाचे आधुनिकीकरण करण्यात आले. राज्यात ७० हजार पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.चांगले काम केले तर बदनामी टळेल. मात्र कामात कुचराई केली तर विभागाची बदनामी होते. त्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी, असे आवाहन करून पोलिसांच्या कार्यावरच शासन चांगले की वाईट हे ठरत असल्याचे स्पष्ट केले.एसआरपीएफ जवानांच्या कार्यक्षमतेमुळेच मालेगाव शहराची विकास व शांततेच्या मार्गावर वाटचाल सुरू असल्याचे सांगून कृषिमंत्री भुसे म्हणाले की, संवेदनशील म्हणून ओळख असणार्‍या मालेगाव शहरात कायदा-सुव्यवस्था व शांतता राखण्यात राज्य राखीव पोलीस दलाचा मोलाचा सहभाग आहे. या इमारतीच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ जवानांचे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमास पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांत विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, काँग्रेसनेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण, धर्माआण्णा भामरे, नंदू सावंत, विजय पवार, संदीप पवार, शिवसेना तालुकाप्रमुख संजय दुसाने, राजेश अलीझाड, निलेश काकडे, भारत बेद, अमोल चौधरी, अनिल पवार आदींसह पोलीस व एसआरपी दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य राखीव पोलीस दलासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय, टीव्ही रूम, अद्यावत स्वयंपाक गृह, भोजन कक्ष अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या संकुलात साधारण ९६ कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था होवू शकेल. यासोबतच एक पोलीस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक अशा अधिकार्‍यांची राहण्याची सोय देखील संकुलात करण्यात आली आहे. या संकुलाच्या इमारतीत सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मलनिस्सारण प्रकल्प आदी सुविधा आहेत.डॉ. आरती सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget