नेवासा : तालुक्यातील जळके शिवारात ७ डिसेंबर रोजी आढळून आलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडले आहे. या महिलेचा औरंगाबाद हद्दीत खून झाल्याचे समोर आले असून, नेवासा पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना मंगळवारी अटक केली. अटक आरोपींकडून आणखी एका खुनाचा उलगडा झाला असून पे्रमसंबंधात अडथळा होत असल्याने दोघांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मंगल सोमनाथ दुसिंग (रा़ तांदुळवाडी ता़ गंगापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील जळके शिवारात कॅनॉलजवळ राजेंद्र जानकू सोनकांबळे यांच्या शेतालगत एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत नेवासा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मयत महिलेचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात सदर महिलेचा मृत्यू तोंड व गळा दाबल्यामुळे झाल्याचे समोर आल्याने खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. श्रीरामपूर सायबर सेल यांच्या मदतीने गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. तेव्हा अमीन रज्जाक पठाण (वय ३५ रा. मज्जिदजवळ, बोलठाण तालुका गंगापूर जि. औरंगाबाद) याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा या गुन्ह्याचे रहस्य उलगडले़ अमीन याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्या इतर साथीदारांचीही नावे सांगितली़. यामध्ये रतन छबुराव थोरात (वय २८ रा.तांदुळवाडी ता.गंगापूर) सोनाली सुखदेव थोरात (वय २२ रा.तांदुळवाडी ता.गंगापूर हल्ली रा.गिडेगाव ता.नेवासा) राहुल भाऊ उघाडे (वय ५० रा.गिडेगाव ता.नेवासा) यांनी मिळून हा खून केला. वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, जयसिंग आव्हाड, कैलास साळवे, राहुल यादव, बबन तमनर, अशोक कुदाळे, भागवत शिंदे, अंकुश पोटे, केवल रजपुत, संदीप म्हस्के, कल्पना गावडे, मनिषा धाने, जयश्री काळे, चंद्रावती शिंदे यांनी आरोपींना अटक केली. ब्लॅकमेल केल्याने मारले मंगल हिला आरोपी अमीन रज्जाक पठाण याचे सोनाली थोरात हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब सोनाली हिचा पती सुखदेव थोरात याला समजली होती़. त्यामुळे ११ नोव्हेंबर २०१८ रोजी अमीन पठाण, रतन थोरात व सोनाली थोरात यांनी सुखदेव थोरात याचा खून केला. सुखदेव याला मारल्याची बाब मंगल सोमनाथ दुसिंग हिला समजली होती. ती अमीन पठाण यास ब्लॅकमेल करून पैसे मागत असे. तिच्यासारख्या पैशाच्या मागणीला कंटाळून अखेर मंगल हिलाही सर्व आरोपींनी मिळून जोगेश्वरी- वाळुंज रस्त्यावर नेऊन तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह जळके शिवारात आणून टाकला.
Post a Comment