हैदराबाद - देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी खात्मा केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भावना व्यक्त करताना, पोलिसांचं कौतुक करत न्याय मिळाल्याचं म्हटलं आहे. हैदराबादच्या दिशा प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर म्हणजे देशासमोर एक उदाहरण ठेवण्यात आल्याचं पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. तर, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली, असे पीडितेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील निर्भयाचे वडिल बद्रीनाथ सिंग यांनीही पोलिसांच्या धाडसी कारवाईला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, मी आणि माझ्या पत्नीप्रमाणे होणाऱ्या अग्निपरीक्षेतून दिशाच्या आई-वडिलांची सुटका झाली, असेही सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडिया आणि नागरिकांमधून पोलिसांची पाठराखण करत कारवाईचं कौतुक होत आहे. तेलंगणा पोलिसांकडून या 4 आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेर पोलिसांनी गोळीबार करत या आरोपींचा एन्काऊंटर केला आहे.
Post a Comment