सिल्लोड, प्रतिनिधी : विद्यालयातील विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणाला दामिनी व निर्भया पथकातील पोलिसांनी तालुक्यातील पालोद येथील यशवंत विद्यालयाबाहेर शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडले. तरुणावर प्रतिबंधक कारवाई करीत भावासमोर समज देऊन सोडून देण्यात आले, अशी माहिती पथकातील पोलिसांनी दिली.
पालोद येथील यशवंत विद्यालयात लागून असलेल्या छोट्या- छोट्या गावांचे विद्यार्थी- विद्यार्थीनी शिक्षण घेण्यासाठी येतात. यातील विद्यार्थीनींची गावातील एक तरुण नेहमी छेड काढत होता. यामुळे तरुणाच्या नेहमीच्या छेडछाडीला कंटाळून या विद्यार्थीनींनी ही माहिती दामिनी पथकाला दिली. शुक्रवारी पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक पंडित इंगळे, सहायक फौसदार भगवान भिसे, विठ्ठल डोके, नायसे, महिला पोलिस मंगला ढोले, सिता ढाकणे यांनी सकाळी पालोद येथे जाऊन पाळत ठेवली व छेड काढणाऱ्या तरुणाला पकडले.
या तरुणावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली व त्याच्या भावासमोर त्याला समज देऊन भावासमक्ष सोडून दिले. शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची छेड काढतात. याला आळा घालण्यासाठी नुकतीच सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी या पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाची पालोद येथे ही पहिली कारवाई केली. या पथकाची शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर करडी नजर राहणार आहे.
शाळा, महाविद्यालय, धार्मिकस्थळे, बस थांब्यावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला, विद्यार्थीनींची रोडरोमिओ छेड काढतात. परंतु त्यांच्या विरोधात कुणी तक्रार करत नाही. यामुळे रोडरोमिओंच्या अशा प्रकाराला बळ मिळते. याला आळा घालण्यासाठी महिला, विद्यार्थीनींनी भीती न बाळगता पोलिसांना कळवावे असे आवाहन पथकातील अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांनी केले आहे.
Post a Comment