अंबड : प्रतिनिधी अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून होत असलेली अवैध वाळु वाहतुक डोकेदुखी ठरत आहे. कारवाई केल्यानंतरही अवैध वाळू वाहतुक थांबत नाही. त्यामुळे ही फक्त कारवाई दिखावू आहे की काय? किंवा या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे हात आहेत का? असा सवाल उभा राहत आहे. यातच जिल्हाधिकारी जालना यांनी महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे वाळू माफिया सोबत संबध उघड झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाई मुळे मोठी खळबळ माजली आहे निलबंनाची कारवाई झालेला बडा अधिकारी कोण याची सर्वांना उत्सुकता लागली असून वाळू प्रकरणात झालेली अनियमितता हेच मोठे कारण निलबंन कारवाईचे असु शकते असा कयास बांधला जात आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी गेल्या महिनाभरापासुन वाळु माफियांच्या विरोधात कारवाईची मोहिम सुरू करीत वाळु माफियांना मदत करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध वाळु वाहतुक रोखण्यासाठी रस्ते देखील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी नुकतेच खोदलेले होते. निलंबनाची कारवाई झालेला तो बडा अधिकारी कोण याबाबत माहिती विचारणा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवु शकलेला नाही. निलंबनाच्या कारवाईमुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
Post a Comment