पहूर, ता . जामनेर :-सद् रक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस दलाचे ब्रीद शिरसावंद्य मानून मुलं पळविणाऱ्या पंधरा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करीत सहा चिमुकल्यांची सुटका केल्याबद्दल खानदेश कन्या पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी यांना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या हस्ते प्रसंशापत्र देवून आज पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.पहूर पेठ (ता. जामनेर ) येथील मुळ रहिवासी असलेल्या अपर्णा जोशी या सध्या चेंबूर येथे गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला असून नुकतेच त्यांनी लहान मुलं पळवून त्यांची विक्री करणाऱ्या १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या अन् त्यांच्या ताब्यातील ६ बालकांना मुक्त केले. त्यांच्या या प्रेरक यशोगाथेबद्दल काल सोमवारी राजधानी मुंबई येथे पोलीस आयुक्तालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात अपर्णा जोशी यांना पोलीस आयुक्त संजय बर्वे, मुंबई यांच्याहस्ते गौरविण्यात आले. त्यांच्या या शौर्याचे पहूर गावांत सर्वत्र कौतूक होत असून त्यांनी गावकऱ्यांपुढे एक आदर्श उभा केला आहे.
Post a Comment