श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या फेरचौकशीसाठी शासनाने नगर महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमली आहे. ही समिती या प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार आहे. नव्याने नियुक्त केलेल्या फेरचौकशी समितीला अहवाल सादर करण्यास तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी नगरपालिका भुयारी गटार प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या परवानगीने याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल झालेला आहे. याबाबत पहिल्या चौकशी समितीने ठपका ठेवलेले तत्कालीन मुख्याधिकारी संतोष खांडेकर, सुमंत मोरे तसेच तत्कालीन बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती.त्यात वर्ग 1 च्या अधिकार्यांची चौकशी वर्ग 2 चे अधिकारी करू शकत नसल्याचे म्हटले होते. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्याला अनुसरून शासनाच्या नगर विकास विभागाने 17 सप्टेंबर रोजी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालकांना पत्र दिले होते. त्यात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी मुख्याधिकारी शिर्डी नगरपंचायत यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत केलेल्या चौकशीत सकृतदर्शनी त्रुटी दिसून येत आहेत. या अभियानाचे नोडल अधिकारी या नात्याने आपल्यामार्फत फेर चौकशी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.त्यानुसार या संदर्भातील फेरचौकशी तीन महिन्यात करून तसा अहवाल शासनाला सादर करावा.तसेच फेरचौकशी अहवाल प्राप्त होऊन त्यावर निर्णय होईपर्यंत यापूर्वीच्या जिल्हा स्तरावरील चौकशी अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. परिणामी तोपर्यंत जिल्हास्तरावरून मुख्याधिकारी शिर्डी नगरपंचायत यांच्या अध्यक्षतेखालील समिती मार्फत करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल स्थगित राहील असेही म्हटले आहे. ही शासनाची भूमिका उच्च न्यायालयात मांडावी असेही सूचित करण्यात आले होते.त्यावर 19 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयानेही जुन्या समिती अहवाल स्थगित ठेवला आहे. या सर्व निर्देशानुसार नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक भालचंद्र बेहरे यांच्या सहीने 25 सप्टेंबर रोजी फेरचौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार फेर चौकशी समितीचे अध्यक्ष अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांचे अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभागाचे सहाय्यक संचालक संजय दुसाने, औरंगाबाद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सिंग आदींची फेरचौकशी समिती नियुक्त केली आहे.
Post a Comment