( प्रतिनिधी )जगाच्या घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता असून यासाठी उर्दू शाळेच्या शिक्षकांची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. मुले शिकली पाहिजे ,सुसंस्कृत झाली पाहिजे यासाठी शिक्षक-पालक यांचे प्रयत्न आवश्यक आहेत . आज समाज बोकाळलाय, महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रत्येक शाळेने सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले. नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये पालक व शिक्षक यांच्या लोकवर्गणीतून प्रत्येक वर्गात बसविण्यात आलेल्या डिजिटल एलईडी चे उद्घाटन, नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख यांच्या सहकार्याने शाळेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे लोकार्पण व नगरपालिकेतर्फे मुलांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाचा वितरण कार्यक्रम नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व श्री बहिरट यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी उद्घाटक म्हणून श्री बहिरट बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक ताराचंद रणदिवे होते. यावेळी नगरसेविका जायदाबी कुरेशी, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक पठाण, जलीलभाई काजी, प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे, फिरोज पोपटिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. बहिरट पुढे म्हणाले कि माता ही मुलांची पहिली शाळा आहे. स्त्रीचे महत्त्व श्रेष्ठ आहे. नगरपालिकेच्या उर्दू शाळेने सीसीटीव्ही बसवून एक आदर्श निर्माण केला. इतर शाळांनी त्या आदर्शाचं अनुकरण करावं. शाळेत शिकणाऱ्या मुलींची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे. आजकाल समाज बोकाळला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, ते पाहून खूप दुःख झाले. तुमची सुरक्षितता पाहणे हे पोलिसांचे काम आहे. समाजातील विचित्र वागणाऱ्या लोकांना नीट केले पाहिजे. जीवनात दोन कामे कमी करा, पण समाजात चांगले संस्कार करा असे आवाहन त्यांनी केले. शहरांमध्ये सध्या एकूण २९ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून शहरातील दानशूर लोकांनी सहकार्य केल्यास ही संख्या अजून वाढविण्यात येईल असेही ते म्हणाले. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी उर्दू शाळा क्र. ५ च्या शिक्षकांच्या कामाचे कौतुक करीत नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक पाच हिचे कार्य नेत्रदीपक असून असेच कार्य सर्व शाळांमधून झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी उर्दू शाळेने आपल्या कामातून इतर शाळांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे असे सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक भाई पठाण यांनी शाळेच्या समस्या मांडून नगरपालिकेने त्या सोडवाव्यात अशी मागणी केली. यावेळी शाळेला एलईडी टी व्ही साठी देणगी देणारे सरकार किराणाचे शाकीरभाई सय्यद, रईस जहागीरदार , मुन्नाभाई बॅटरीवाले, जलीलभाई काजी, फिरोज पोपटिया, हुजेफ जमादार ,इम्तियाज खान, सलीम जहागिरदार, वहिदा सय्यद, आस्मा पटेल यांचा मान्यवरांच्या हस्ते शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकपदी बढती मिळाल्याबद्दल सलीमखान पठाण व परवीन शेख यांचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी केले. सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा यांनी केले तर फारुक शाह यांनी आभार मानले. कार्यक्रमास शरीफ कुरेशी, फयाज कुरेशी, कासम शाह ,अन्वर आत्तार, अन्सार आत्तार, नजीर आत्तार, जमील शहा, पत्रकार प्रदीप आहेर , अल्ताफ इमाम शेख ,साजिद कुरेशी, अशपाक शहा, इरशाद शेख, रशीद शेख, बदर शेख ,जावेद सर, रुबीना बाजी आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Post a Comment