शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या नाकाबंदीत बेहिशोबी रक्कम घेऊन जाणार्या राहुरी येथील व्यापार्याकडून 2 लाख 70 हजार रुपये महिंद्रा कंपनीच्या जितो या गाडीतून हस्तगत केले. सदरची रक्कम फ्लाईंग स्कॉड व स्टँटी पथकाच्या ताब्यात देऊन राहाता तहसीलदारांकडे कारवाई करण्याकरिता पाठवून देण्यात आली.आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाहतूक, तसेच बेहिशोबी रक्कम व मौल्यवान वस्तू घेऊन जाणार्यांवर कारवाई करता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग व नाकाबंदी लावण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, यांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या सुचनेनुसार, शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, पोलीस उपनिरीक्षक जाने, पोलीस नाईक़ जी. ई. सोनवणे, पी. डी. अंधारे, श्री. कुर्हे, पोलीस कॉन्स्टेबल मैंद, श्री. पंडोरे तसेच चार होमगार्ड या पथकाने शासकीय वाहनातून पेट्रोलिंग करत असताना शिर्डी शहरातीन आरबीएल चौकात लावलेल्या नाकाबंदीत एक महिंद्रा कंपनीची जितो गाडी राहात्याकडून येत असतांना तिला थांबवून गाडीची तपासणी केली असता चालकासोबत असलेल्या राहुरीतीलच व्यापार्याच्या ताब्यातून 100 रुपयाच्या 1600 नोटा, 500 रुपयाच्या 200 नोटा, 20 रूपयाच्या 200 नोटा 10 रुपयाच्या 600 नोटा असे मिळून एकूण 2 लाख 70 हजार रुपये मिळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून या रकमेबाबत कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळून आले नाही. त्यामुळे सदर पथकाने सदरची रक्कम जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या फ्लाईंग स्कॉड व स्टँटी पथकाच्या ताब्यात देवून राहाता तहसीलदारांकडे कारवाई करण्याकरिता पाठवून देण्यात आली.
Post a Comment