(प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील घोडेगावात नगर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल गुडलकजवळ 14 ऑगस्टच्या रात्री सचिन गोरख कुर्हाडेवर फायर झाला होता. या गोळीबारातील पसार आरोपींपैकी भारत सोपान कापसे (वय-23 रा.कांगोणी, ता.नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 30 हजार 200 रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल व मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.घोडेगाव येथील कुर्हाडेवर 14 ऑगस्टच्या रात्री कृष्णा फुलमाळी व त्याच्या साथीदारांनी गावठी पिस्तूल मधून गोळीबार केला होता. यात कुर्हाडे गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, कर्मचारी रवींद्र कर्डीले, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, राम माळी, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश सातपुते, संदीप दरंदले, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, सचिन कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली.दरम्यान, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या गोपीनीय माहितीनुसार आरोपी भारत कापसे हा पांढरीपुल येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने पांढरीपुल शिवारात मिरीरोडवर सापला रचत आरोपीचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे 30 हजार 200 रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल व मॅगझीन मिळून आले. गुन्ह्याबाबत चौकशी केली असता हा गुन्हा कृष्णा फुलमाळी याच्या साथीने केला असल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
Post a Comment