हजारो शेतकर्यांवरील जलसंकट टळले उंबरे (वार्ताहर)-राहुरी तालुक्यातील उंबरे येथील पेटीपुलाशेजारी मुळा उजवा कालव्याला पडलेले भगदाड दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. काल मंगळवार दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता 700 क्युसेकने मुळा उजवा कालव्याला आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधार्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली.या सिमेंट नळ्यामध्ये स्फोट घडविणार्या अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उंबरे परिसरातील शेतकर्यांनी मोरे यांच्याकडे केली आहे. उंबरे उजवा कालव्याला पेटीपुलाशेजारी असणार्या ससे-गांधले लिप्टच्या सिमेंट नळयामध्ये काही विघ्नसंतोषी लोकांनी स्फोट घडवून आणल्यामुळे त्या नळ्या आतून फुटल्या होत्या. त्यामुळेच मोठे भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. कालवा बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याठिकाणी लिप्टची सिमेंट नळी काँक्रिटने पूर्ण बंद केल्यामुळे आता उंबरे करपरा नदीला पाणी सुटणार नाही. त्यामुळे हजारो शेतकर्यांवर जलसंकट तयार होणार आहे. आज बुधवारी पूर्ण क्षमतेने पाणी सुटणार असल्याचे अभियंता मोरे यांनी सांगितले. दरम्यान, कालव्याला भगदाड पाडण्यात आल्याने आवर्तन बंद करण्यात आले परिणामी राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डीतील हजारो शेतकर्यांपुढे प्रश्न निर्माण झाला होता. पण आता हे संकट टळले आहे.
Post a Comment