सामूहिक बलात्कार प्रकरण तापले.

सामूहिक बलात्कार प्रकरण:तपास अहवाल सादर करण्याचे महिला आयोगाचे पोलिसांना आदेश 
मुंबई:चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली.
चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली.  या प्रकरणाचा तपास अहवाल शनिवारी सादर करा, असे आदेश आयोगाने चुनाभट्टी पोलिसांना दिले. गुन्ह्य़ात हत्येचे कलम जोडण्याची सूचनाही आयोगाने पोलिसांना केली.

जालना येथून दोन महिन्यांपूर्वी मुंबईत नातेवाईकांकडे वास्तव्यास आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल आहे. दुर्धर आजाराने प्रकृती खालावली म्हणून या तरुणीला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या तरुणीवर लैंगिक अत्याचार घडल्याचे तेथील डॉक्टरांच्या तपासणीत आढळले. तरुणीने आपल्यावर ७ जुलैला चेंबूर परिसरातील चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर ते चुनाभट्टी पोलिसांकडे वर्ग केले गेले.

दोन दिवसांपूर्वी तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांवर आरोप, टीकेची झोड उठली. संशयित तरुणांची नावे देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही, असा आरोप तरुणीच्या कुटुंबाने केला, तर राजकीय पक्षांनी मोर्चे काढून निषेध नोंदवला.

प्रत्यक्षात हा गुन्हा चुनाभट्टी पोलिसांकडे  वर्ग झाल्यावर एक पथक औरंगाबादला तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी रवाना झाले. मात्र तोपर्यंत तरुणी बेशुद्धावस्थेत गेली होती. ती शुद्धीवर आलीच नाही. त्यामुळे पोलीस तिचा जबाब घेऊ शकले नाहीत. गुन्हा दाखल झाल्याचे आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती तिने प्रकृती खालावलेल्या अवस्थेत वडिलांना दिली. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. ज्या संशयित तरुणांवर कुटुंबाने आरोप केले ते घटना घडली त्या वेळी इतरत्र असल्याचे आढळले, असे पोलिसांचे म्हणने आहे.
दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाने शुक्रवारी पोलिसांना नोटीस बजावत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हत्येचे कलम जोडण्याबरोबरच तरुणीच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतील तरतुदींनुसार आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा शिफारशी केल्या आहेत.
मोर्चा, रास्तो रोको : पोलिसांनी  आरोपींना अटक केली नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यात खासदार सुप्रिया सुळे, आमदार विद्या चव्हाण, पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार सुळे यांनी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आणि आरोपींना त्वरित अटक करण्याची, त्याचबरोबर तरुणीच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच शुक्रवारी संध्याकाळी सामाजिक, राजकीय संघटनांनी शीव-पनवेल महामार्गावर आंदोलन केले. यावेळी रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. पीडीत तरुणीच्या नातलगांनीही गुरुवारी आंदोलन केले होते.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget