श्रीरामपूर (प्रतिनिधी) पक्षातून जे गेले त्यांच्याबद्दल विचार करण्याची गरज वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लावला. श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलातील विविध इमारतींचे उद्घाटन व नामकरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभेत असताना पक्षातून एकावेळी 60 लोकांपैकी 52 लोक मला सोडून गेले होते. परंतु तरीही मी पुन्हा उभा राहिलो. लोकशाहीत कुणी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे जे गेले त्याबद्दल आता विचार करण्याची गरज नाही राज्यात वाढलेली बेरोजगारी, देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट, शेतकर्यांचे विविध प्रश्न दारिद्य्र या मुलभूत प्रश्नांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यावेळी जनता बळी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी निर्माण होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कमी करण्याचे सत्र सुरू केले आहे. परंतु सत्ताधारी सांगतात की, परिस्थिती चांगली आहे परंतु बँकींग क्षेत्रातून काही लाख कोटी बाजूला काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार नोकर्यांपाठोपाठ उद्योगही बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. परंतु ही स्थिती भयावह आहे. आर्थिक मंदी संदर्भात वेळ पडल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही श्री. पवार म्हणाले विधानसभेच्या जागा वाटपाबाबत त्यांना विचारले असता 120 राष्ट्रवादी, 120 काँग्रेस व 48 मित्रपक्ष या फॉर्म्युल्यावर आमची चर्चा सुरू आहे. जनतेच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. घाटमाथ्यावरून समुद्राला जाणारे पाणी वळविण्याचा निर्णय चांगला आहे, पण त्यासाठी लागणारी पुरेशी वीज महाराष्ट्रात उपलब्ध नाही. हे सर्व करताना तज्ज्ञांच्या मतांचा विचार झाला पाहिजे, असेही खा. पवार म्हणाले.
अन् शरद पवार भडकले! सध्या अनेक आमदार व मोठे नेते वेगवेगळ्या कारणांमुळं राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या तंबूत जात आहेत. वर्षानुवर्षे पवारांना साथ देणार्या दिग्गज नेत्यांचाही यात समावेश आहे. पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील हेही भाजपच्या वाटेवर आहेत. याच अनुषंगानं श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला गेला. या प्रश्नामुळं शरद पवार भडकले. इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं? असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता? तुम्ही माफी मागा, असं म्हणत थेट निघून जाऊ लागले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणार्या पत्रकाराला शांत केले. त्यानंतर पवार पुन्हा बसले. किमान सभ्यता न पाळणार्या लोकांना तुम्ही बोलवत जाऊ नका आणि त्यांना बोलवायचं असेल तर मला बोलवू नका, असं त्यांनी उपस्थितांना सुनावलं. आपण गेलात तर बरं होईल, असंही पवारांनी संबंधित पत्रकाराला हात जोडून सांगितलं.
Post a Comment