नाशिक । प्रतिनिधी शहरात जबरी चोरी करणार्या आंतरराज्य टोळीतील तिघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीकडून पैशांची बॅग, मोबाइल आणि चैन ओरबाडून नेण्याचे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खुशाल उर्फ मन्या उर्फ मनोज अशोक मोकळ (१९, रा. धुळे), समाधान उर्फ संभा देवदास निकम (२३, रा. शिवाजी नगर, सातपूर, मुळ रा. धुळे) आणि विनोद छगन मोहिते (२६, रा. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत या टोळीतील एक संशयित विलास मिरजकर हा इंदिरानगर येथील व्यापार्याकडे दरोडा टाकून खून केल्याप्रकरणात कारागृहात आहे. या संशयितांकडून चार दुचाकी, १४ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोबाइल ओरबाडून नेल्याप्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जिल्हा रुग्णालय परिसरात सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी गंगापूर रोडवरील आनंदवल्ली परिसरात काही दिवसांपूर्वी दुचाकीस्वाराकडील मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली.त्यानंतर सखोल चौकशीत त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर २०१८ मध्ये ध्रुव नगर येथे वाईन शॉप चालकाकडील १ लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेल्याची कबुली दिली.डिसेंबर २०१८ मध्ये द्वारका परिसरात व्यापार्याचा पाठलाग करून त्याच्याकडील १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी खेचून नेल्याची कबुली दिली.या संशयितांकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचीन खैरनार, सुनीता निमसे, उपनिरीक्षक बलराम पालकर व कर्मचारर्यांनी ही कामगिरी केली.
Post a Comment