जागेच्या वादातून 30 वर्षीय आदिवासी महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नऊ जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि 376 ड नुसार सामुदायिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये शिवसेनेचे नगर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांचा समावेश आहे. फुलसौंदर यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच नगर शहरात जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात माजी महापौर फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर (सर्व रा. बुरुडेमळा, नगर) व त्यांचे सोबत अनोळखी 5 इसमांचा समावेश आहे. याबाबत पीडित आदिवासी महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 12 ऑगस्टरोजी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान बुरुडगाव रोड येथील पडीक रानात ती बकर्या चारीत होती. त्यावेळी भगवान फुलसौंदर यांच्यासह इतर लोक तेथे आले. तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबतच जागेचा वाद मिटवायचा आहे की नाही, असे म्हणत आरोपींनी महिलेस लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली.मारहाणीमुळे ती महिला अर्धवट बेशुद्ध पडली. त्यानंतर गणेश फुलसौंदर व महेश फुलसौंदर यांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी इतरांनी घेराव घातला व त्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यास तुला व तुझे कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी दिली, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संबंधीत महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायदा व सामुहिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करत आहे.
Post a Comment