Latest Post

प्रतिनिधी :-
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी आज  हवेतून तब्बल ७१ कि. मी. ची भ्रमंती केली.
      पॅरामोटर या हवेतील साहसी क्रीडा प्रकारातील ११ वी जागतिक स्पर्धा जून २०२० मध्ये ब्राझील येथे होऊ घातली असून तंबाल तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असलेल्या देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे मार्गदर्शन घेणेसाठी व सराव करणेसाठी देशभरातील खेळाडू सध्या देवळाली प्रवरा येथे येत आहेत. 
त्याचाच एक भाग म्हणून भारतीय स्थल सेनेचे रिटा. कर्नल हिमांशू सील आज देवळाली प्रवरा येथे आले व आप्पासाहेब ढुस यांचे सोबत सराव केला. 
      आज सकाळी राहुरी एम आय डी सी परिसरातून सकाळी ०७.२३ वा आप्पासाहेब ढुस व कर्नल सील यांनी स्वतंत्र पॅरामोटर साहित्यावर उड्डाण घेतले व जवळपास १००० फूट उंची वरून  राहुरी एम आय डी सी येथून राहुरी  फॅक्टरी मार्गे श्रीरामपूर रस्ता समोर ठेवून देवळाली प्रवरा, नरसळी, बेलापूर, श्रीरामपूर वरून थेट खैरी निमगाव गाठले. 
      खैरी निमगाव येथील आप्पासाहेब ढुस यांचे मेव्हणे एकनाथ चंद्रभान कालांगडे यांचे वस्तीला वळसा घालून ढुस व कर्नल सील यांनी पुन्हा खैरी निमगाव, श्रीरामपूर मार्गे बेलापूर देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी ते राहुरी एम आय डी सी परिसर असा परतीचा प्रवास पूर्ण करून सकाळी ०८.५४ वा. जेथून उड्डाण केले तेथेच यशस्वी लँडिंग केले. 
     आप्पासाहेब ढुस व कर्नल सील यांनी थोर२५० या इंजिनाचा वापर करून प्रत्येकी ०८ लिटर इंधनात तासी ६४ कि. मी. वेगाने ०१:३१:०४ इतक्या विक्रमी वेळेत हा प्रवास पूर्ण करीत पुढील जागतिक स्पर्धेच्या सरावाचा श्रीगणेशा केला.
     हे उड्डाण यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब क्षीरसागर व जेम्स पाळंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोल्हार प्रतिनिधी : (साईप्रसाद कुंभकर्ण ) 
महाराष्ट्र चे वैभव अहमदनगर जिल्ह्यातील व राहुरी नगरीचे भुमिपुत्र असलेले व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय किर्तीचे विश्वशिवशाहिर डॉ. विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्र परिसरात बांधकाम करण्यात आलेल्या शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा येत्या 25 डिसेंबरला संपन्न होणार आहे. शिवाश्रमासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते व त्यांच्या कुटुंबीयांनी 50 गुंठे जमीन विनामूल्य दान करून अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या जागेवर 4200चौरस फूट आकाराची भव्यदिव्य शिवाश्रम इमारतीची उभारणी झाली आहे.
शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांनी त्यांच्या पोवाड्याच्या त्याचबरोबर किर्तन व्याख्यान आदी कार्यक्रमातून जमा झालेले मानधन शिवाश्रमासाठी तसेच आईने शिवाश्रमासाठी जमा करून ठेवलेले एक लाख तसेच महाराष्ट्रातील विविध दानशूरांनी यथाशक्ती वस्तू व आर्थिक स्वरुपात मदत केली. या सर्वांच्या सहकार्यातून शिवाश्रमाची भव्य इमारतीची निर्मिती झाल्याची भावना तनपुरे महाराज यांनी व्यक्त केली आहे.

समाजातील दिव्यांग घटकांच्या आर्थिक व सामाजिक उत्कर्षासाठी अंध अपंग निराधारांना आधार व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन अधिकारी बनण्याची स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना येथे मार्गदर्शन केंद्रामार्फत राजपत्रित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारातून आर्थिक पाठबळ निर्मितीचा या केंद्राचा हेतू असून, हे केंद्र निवासी स्वरूपाचे असून निराधार व्यक्तींना या केंद्राचा मोठा आधार लाभणार आहे. दिव्यांगांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणून डॉ.विजय तनपुरे यांची धडपड सुरू आहे. 

आपल्या शिवगर्जना व शिवायण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम तनपुरे महाराज बाजुला ठेवत आहे. त्यांचे गुरू राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे शिवाश्रमाची स्वप्न होते .त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले, परंतु अडथळ्यांची शर्यत पार करत असताना त्यांना अपयश येत होते. त्यामुळे जोपर्यंत शिवाश्रम निर्मिती होत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही असा निर्धार त्यांनी साडेचार वर्षांपूर्वी केला. त्यामुळे सुमारे साडेचार वर्षापासून तनपुरे महाराज अनवाणी महाराष्ट्रभर फिरत कार्यक्रम करत आहे .

शिवाश्रमाची निर्मिती झाल्यामुळे त्यांचा हा संकल्प तडीस जाणार आहे.शिवाश्रम हा समाजातील प्रत्येक घटकाच्या मदतीतून उभा रहात असून अनेकांनी यथाशक्ती त्यासाठी योगदान दिले आहे याशिवाय श्रमाच्या निर्मितीमध्ये मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे केंद्राध्यक्ष मधुकर गीते त्यांची पत्नी शीला, मुलगा दीपक, सून वनिता हे अहोरात्र शिवाश्रम निर्मितीसाठी कुठलेही अपेक्षा व्यक्त न करता एक आपल्या घरचेच कार्य म्हणून त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे.शिवाश्रम बांधकामाच्या निर्मितीत लागणारे सर्व सहकार्य तसेच मदतनिधी व वस्तू रूपाने दानशूरांना शिवाश्रमासाठी सर्व प्रकारची मदत केली जात आहे. शिवाश्रमाची निर्मिती यापूर्वी शिर्डी येथे विमानतळ परिसरात होणार होती परंतु तिथे मूळ जागेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तेथील शिवाश्रम बांधकामास स्थगिती देण्यात आली.

दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिवाश्रमाचे सिन्नर तालुक्यातील मेंढी या गावामध्ये सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या परिसरात लोकार्पण कार्यक्रम होणार असून, त्या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे दुपारी चार वाजता कीर्तन होणार असून त्यानंतर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाश्रमाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
शिवाश्रमाच्या या लोकार्पण सोहळ्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, खासदार छत्रपती संभाजी महाराज , महंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू ,श्री.कृष्णप्रकाशजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुमंतबापू हंबीर,आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार पुण्याच्या लिज्जत पापड चे संचालक सुरेश कोते नाशिकचे खासदार हेमंत गोडसे सिन्नर तालुक्यातील किर्तांगळी गावचे भूमिपुत्र व सध्या दिल्ली नोएडा येथील सुदर्शन न्युज चॅनेल चे संचालक सुरेश चव्हाणके सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे माजी आमदार राजाभाऊ वाजे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे संगमनेरचे मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉ. संजय मालपाणी पुण्याचे शिवभक्त अभिनेते सचिन गवळी स्नेहालय संस्थेचे गिरीश कुलकर्णी दीपस्तंभ संस्थेचे यजुर्वेद महाजन शांतीवन( बीड) चे दीपक नागरगोजे पुण्याचे उद्योजक विजय सेठी , गुजरातचे योगेंद्र सहानी  आदी मान्यवर या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्‍हान शिवाश्रमाचे वतीने करण्यात आले आहे.

कोल्हार :- येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश  व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ,स्कूलच्या प्रांगणात श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार रवी भागवत व भरतकुमार उदावंत यांनी सादर केलेल्या व्यंगचित्र प्रात्यक्षिकांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला कुंचल्याच्या अवघ्या काही फटकार्यातून या जोडीने देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यंगचित्रे साकारली न्यू इंग्लिश स्कूलच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते 
प्रारंभी विविध क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्राचार्य शशिकांत सोनवणे ,उपप्राचार्य चौधरी ,पर्यवेक्षक, गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख गुंजाळ, गुरुकुल चे समन्वयक निंबाळकर ,सचिन खंडागळे, दीपक मगर ,कलाशिक्षक ए.जी नवले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुंभकर्ण आदी उपस्थित होते 
यावेळी श्रुती खंडागळे, श्रेया खंडागळे गौरी गाढे शाजिया शेख या विद्यार्थ्यांचे सत्कार झाले इयत्ता नववी मध्ये हस्त  चित्रांच्या पाठांचे महत्व भागवत यांनी विशद केले
उदरनिर्वाहासाठी विविध उद्योग करण्याबरोबर आपण पु ल देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या कलेशी मैत्री आवश्यक जोडावी व जीवनातील खरा आनंद मिळावा असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले उदावंत यांनी आपल्या खास शैलीत वात्रटिका सादर करून विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीचा संदेश दिला लहानपणापासूनच व्यायामाची आवड निर्माण झाल्यास तरुणपणी मुलांची पावले भरकटली जात नाहीत व्यायाम व सोबत कलेची जोड यामुळे तरुण पिढी व्यसनापासून दूर ठेवली जाऊ शकते 
 अशी आशा त्यांनी व्यक्त केली पाहुण्यांचा परिचय पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन खंडागळे यांनी केले तर आभार दीपक मगर यांनी मानले.

अहमदनगर (प्रतिनिधी)-महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैदराबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.रामचंद्र पांडुरंग वैद्य (मूळ रा. बोधेगाव, ता. शेवगाव) या पोलीस कर्मचार्‍यास पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याला जामीन मिळवून देण्यासाठी आणि तपासात त्याला मदत करण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकाकडे पोलिस कर्मचारी वैद्य यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली.आरोपीच्या मामाने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नगरच्या पोलिसांनी सापळा रचला. पारनेरमधील एका हॉटेलमध्ये पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पोलिसाला पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलीस उपाअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस हवालदार तनवीर शेख, सतीष जोशी, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, हारूण शेख, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने केली.पकडण्यात आलेला पोलिस वैद्य पोलिस निरीक्षकाचा रायटर आणि तपासात मदत करणारा कर्मचारी आहे. त्याआधारे ही लाच स्वीकारून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याचे आणि पुढेही तपासात मदत करून सुटकेचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन त्याने आरोपीच्या मामाला दिले होते. 

अहमदनगर- जीवनसाथी वेबसाईटवर महिलांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित एकास सायबर क्राईम विभागाने जेरबंद केले आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १६ नोव्हेंबर २०१८ ते दि.१३ डिसेंबर २०१९ या कालावधीत रेखा निलेश कदम (रा.अकती बिल्डिंग, एचएमसी मार्केट जवळ सेक्टर १९ वाशी, नवीमुंबई) असे नाव सांगणारे अज्ञात व्यक्तीने आँनलाईन जीवन साथी या वेबसाईट वरुन संपर्क करून व्हाँटसअप मेसेजद्वारे लग्नाचे आमिष दाखवून १ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाली, अशी फिर्याद हनुमान मोहनराव काळे (रा.सारोळा ता.जामखेड) यांनी अहमदनगर सायबर क्राईम विभागात दाखल केला होता. या दाखल गुन्ह्याचा सखोल व तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी हा बोरवली पश्चिम, मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रायडोगरी, कार्टर रोड बोरवली पश्चिम मुंबई या ठिकाणी विविध भागात, झोपडपट्टीत आरोपीचा शोध घेतला. त़ो दि.१८ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास रायडोगरी, मुंबई परिसरात छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीला पोलीस खाक्या दाखवताच, गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर बनावट अकाऊंट वरुन अन्य लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोपींने सांगितले.प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पो.नि.अरुण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी, पोहेकाँ योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोना दिगंबर कारखिले, मलीकार्जुन बनकर, म पोना स्मिता भागवत, पोकाँ अरुण सांगळे, पोहेकाँ वासुदेव शेलार, पूजा भांगरे, राहुल हुसळे, विशाल अमते, भगवान कोंडार, अमोल गायकवाड, राहुल गुंडू, अभिजित अरकल आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील मौलाना आझाद चौकातील पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीची सुरक्षा व्यवस्था वार्‍यावर सोडण्यात आली आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून टाकीची स्वच्छता नसल्याने स्वच्छतेबाबतही बारा वाजले आहेत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु पालिका प्रशासनाचे टाकीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष आहे.अनेक दिवसांपासून शहरातील नागरिकांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. त्यातच नगरपालिकेमार्फत आपल्या घरी येणारे पाणी ज्या टाक्यांतून येते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील मौलाना आझाद चौकातील पाण्याच्या टाकीवर जाणार्‍या पायर्‍या तुटल्याने त्या टाकीला धोका निर्माण झाला आहे. वर जाता येत नसल्याने
टाकीची स्वच्छताही करता येत नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून टाकीची स्वच्छता करण्यात आलेली नाही. या टाकीद्वारे शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.परंतू टाकीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. टाकीची साफसफाई झालेली नसल्याने शहरातील नागरिकांना अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. सदर टाकी स्वच्छ झाली नसल्याने टाकीत शेवाळ व अन्य घाण मोठ्या प्रमाणावर साचली आहे. यामुळे यातील पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. या गंभीर विषयाकडे नगरपालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. जबाबदार अधिकारी व नगरसेवकांचे या गंभीर बाबीबाबत अनेक वेळा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याची योग्य दखल घेतली नाही. तरी लवकरात लवकर पाण्याच्या टाकीची स्वच्छता व्हावी अशी, मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.अन्यथा गेटबंद आंदोलन मौलाना आझाद चौकातील पाण्याची टाकीची साफसफाई करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास एक जानेवारी 2020 रोजी नगरपालिका गेटबंद आंदोलन करण्यात येईल.-अहमदभाई जहागीरदार, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.

अहमदनगर - पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथील हत्याकांडातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाच्या आत अटक करून पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्याची जलदगतीने कारवाई केली.ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे ( वय २८), राहुल शहादेव दहिफळे (वय २२) व भागवत हरिभाऊ नागरगोजे (वय ५०) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दैत्य नांदूर (ता.पाथर्डी) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणातून शहादेव पंढरीनाथ दहिफळे याने संजय बाबासाहेब दहिफळे व गणेश रमेश दहिफळे यांच्यावर बंदुकीने गोळीबार करून आरोपी विष्णू पंढरीनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, द्वारका भागवत नागरगोजे, विष्णू दहिफळे यांची पत्नी, शहादेव दहिफळे यांची पत्नी व दोन मुले, ज्ञानेश्वर दहिफळे यांची पत्नी, पंढरीनाथ दहिफळे, अनिकेत भागवत दहिफळे (सर्व रा.दैत्य नांदूर ता.पाथर्डी) यांनी संजय बाबासाहेब दहिफळे, गणेश रमेश दहिफळे यांना लाकडी दांडके व कु-हाडीने मारहाण करून संजय बाबासाहेब दहिफळे याची हत्या केली. गणेश रमेश दहिफळे यास जिवे मारण्याचा प्रयत्न करून साक्षीदार ज्ञानेश्वर अशोक दहिफळे यास जखमी केले. या घटनेबाबत गणेश रमेश दहिफळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात कलम ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, ७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)१३५ प्रमाणे सर्व आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी व अहमदनगर येथे शोध घेऊन ज्ञानेश्वर विष्णू दहिफळे, राहुल शहादेव दहिफळे व भागवत हरिभाऊ नागरगोजे याना पकडून पाथर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिलीप पवार यांनी वेगवेगळ्या पथकाना दिलेल्या सुचनेनुसार पोसई गणेश इंगळे, पोहेकाँ विजय वेठेकर, रविंद्र कर्डिले, मन्सूर सय्यद, आण्णा पवार, संदीप घोडके, सागर गंवादे, रणजित जाधव, रोहिदास नवगीरे, रोहित मिसाळ, कमलेश पाथरूड, राहुल सोळुंके, दत्तात्रय गव्हाणे, शिवाजी ढाकणे, सचिन आडबल, सागर ससाणे, सागर सुलाने, रवि सोनटक्के, विनोद मासाळकर, विजय धनेधर, देवेंद्र शेलार, जालिंदर माने, संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे आदींच्या पथकांनी ही कारवाई केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget