प्रतिनिधी :-
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी आज हवेतून तब्बल ७१ कि. मी. ची भ्रमंती केली.
पॅरामोटर या हवेतील साहसी क्रीडा प्रकारातील ११ वी जागतिक स्पर्धा जून २०२० मध्ये ब्राझील येथे होऊ घातली असून तंबाल तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असलेल्या देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे मार्गदर्शन घेणेसाठी व सराव करणेसाठी देशभरातील खेळाडू सध्या देवळाली प्रवरा येथे येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून भारतीय स्थल सेनेचे रिटा. कर्नल हिमांशू सील आज देवळाली प्रवरा येथे आले व आप्पासाहेब ढुस यांचे सोबत सराव केला.
आज सकाळी राहुरी एम आय डी सी परिसरातून सकाळी ०७.२३ वा आप्पासाहेब ढुस व कर्नल सील यांनी स्वतंत्र पॅरामोटर साहित्यावर उड्डाण घेतले व जवळपास १००० फूट उंची वरून राहुरी एम आय डी सी येथून राहुरी फॅक्टरी मार्गे श्रीरामपूर रस्ता समोर ठेवून देवळाली प्रवरा, नरसळी, बेलापूर, श्रीरामपूर वरून थेट खैरी निमगाव गाठले.
खैरी निमगाव येथील आप्पासाहेब ढुस यांचे मेव्हणे एकनाथ चंद्रभान कालांगडे यांचे वस्तीला वळसा घालून ढुस व कर्नल सील यांनी पुन्हा खैरी निमगाव, श्रीरामपूर मार्गे बेलापूर देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी ते राहुरी एम आय डी सी परिसर असा परतीचा प्रवास पूर्ण करून सकाळी ०८.५४ वा. जेथून उड्डाण केले तेथेच यशस्वी लँडिंग केले.
आप्पासाहेब ढुस व कर्नल सील यांनी थोर२५० या इंजिनाचा वापर करून प्रत्येकी ०८ लिटर इंधनात तासी ६४ कि. मी. वेगाने ०१:३१:०४ इतक्या विक्रमी वेळेत हा प्रवास पूर्ण करीत पुढील जागतिक स्पर्धेच्या सरावाचा श्रीगणेशा केला.
हे उड्डाण यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब क्षीरसागर व जेम्स पाळंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment