कोपरगाव (गौरव डेंगळे): श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित ‘शारदा एक्सप्रेस खो खो संमिश्र लीग २०२५’ ही राज्यस्तरीय स्पर्धा शनिवार, २६ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि पावसाच्या सरींसह संपन्न झाली. कोपरगाव, संगमनेर, येवला, अहिल्यानगर येथून आलेल्या एकूण १३ संघांनी सहभाग घेतलेला असून १८ सामन्यांमध्ये दमदार खेळाचा थरार अनुभवायला मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,युवराज नगरकर,संकेत पारखे, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर,रामदास खरात, अजित पवार,रवी नेद्रे, भरत थोरात आणि दिगंबर गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
चार गटांमध्ये विभागलेली ही स्पर्धा गटसाखळी,उपांत्य आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यांमध्ये झाली. अ गटातून नूतन विद्यालय संगमनेर, ब गटातून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर, क गटातून दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगर आणि ड गटातून आत्मा मालिक कोकणठाण यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य सामन्यात दिग्विजय क्रीडा मंडळने नूतन विद्यालयाचा पराभव केला, तर दुसऱ्या लढतीत आत्मा मालिक संघाने आदर्श स्कूलवर मात केली.
अंतिम सामन्यात आत्मा मालिक कोकणठाण संघाने जबरदस्त खेळ करत दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगरचा पराभव केला आणि शर्यतीचे विजेतेपद पटकावले. यावेळी खेळाडूंनी पावसाचे आव्हान अंगिकारत मैदानावर चिवट झुंज दिली आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून राधिका भोसले आणि जयदत्त गाडेकर यांना गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचा मानकरी तनिष मानकर ठरला. स्पर्धेत विविध सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित हसे, साईराज पाटील, साहिल नेहे, तेजल रोकडे, साई सरोदे, साई भराडे, अनामिका आहेर, कार्तिक कराळे, रिंकू वळवी, मनीषा वळवी, अर्णव थोरात, अमित वासवे आणि तनवी देवकर यांचा समावेश होता.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये पंच म्हणून अण्णासाहेब गोपाल, बाळासाहेब शेळके, गणेश वाघ, गणेश मोरे, रितेश माळवदे, ओम जगताप, यश जाधव, साई जाधव, प्रसाद मावळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्यात नेतृत्वगुण, संघभावना, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास यांचे उत्तम संकलन घडल्याचे दृश्य मैदानात दिसून आले.पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विजेता आत्मा मालिक कोकणठाण संघाला ₹२१०० रोख रक्कम व चषक देण्यात आला, तर उपविजेता दिग्विजय मंडळ अहिल्यानगर संघाला कोपरगाव क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय देवकर यांच्या हस्ते ₹१००० रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच सर्वोत्तम खेळाडू, अंतिम सामन्याचा मानकरी व इतर उल्लेखनीय खेळाडूंनाही स्मृतिचिन्हे देण्यात आली.
‘शारदा एक्सप्रेस खो खो लीग’ ही स्पर्धा केवळ एक खेळ नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी मंच ठरली आहे.
*कोट*
"कालपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला पावसाने वेढलं होतं... प्रश्न होता, 'स्पर्धा होणार तरी कशा?' पण मनामध्ये एक आशा होती, की देव जिथं खेळाचं मंदिर असतं, तिथं पावसालाही थांबावं लागतं. आज सकाळी मैदानावर आलो, ओलसर माती, पाण्याच्या साऱ्या, पण मनात एकच विनंती – ‘देवा, चार तास विश्रांती दे… खेळू दे आमचं स्वप्न.’ आणि खरंच... पावसाने थोडं बाजूला सरून मैदान खुलं केलं आणि शारदा खो खो लीगचा थरार साऱ्या सीमारेषा तोडून मैदानावर अवतरला!"
गौरव अरविंद डेंगळे (क्रीडा मार्गदर्शक)